प्रचारतोफा थंडावल्या; आता गुपचूप नियोजन !

By Admin | Updated: October 14, 2014 00:34 IST2014-10-14T00:23:29+5:302014-10-14T00:34:01+5:30

लातूर : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धूमधडाका सोमवारी सायंकाळी ६ वाजता थंडावला. लातूर शहरात दिवसभर सभा, पदयात्रा, रॅली आदींनी शहर दुमदुमून गेले होते.

Promotions stopped; Now secretly planning! | प्रचारतोफा थंडावल्या; आता गुपचूप नियोजन !

प्रचारतोफा थंडावल्या; आता गुपचूप नियोजन !


लातूर : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धूमधडाका सोमवारी सायंकाळी ६ वाजता थंडावला. लातूर शहरात दिवसभर सभा, पदयात्रा, रॅली आदींनी शहर दुमदुमून गेले होते. सकाळी ८ वाजेपासूनच लातूर शहराच्या विविध भागांत राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गृहभेटींबरोबरच पदयात्रा काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. चित्रपट अभिनेते, अभिनेत्री तसेच उमेदवारांनी भव्य शक्तीप्रदर्शन करून विजय आपलाच असल्याचे शक्तीप्रदर्शनातून दाखवून दिले. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आता उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते ‘गुपचूप’ प्रचाराच्या कामात व्यस्त झाले आहेत.
लातूर जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील प्रमुख शहर व जास्त लोकसंख्येच्या गावांमध्ये शक्तीप्रदर्शन करून प्रचाराचा समारोप केला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून विजय आपलाच असल्याचे ठणकावून सांगत मतदारांना पटवून देण्यात आले.
जिल्ह्याचा विकास, बेरोजगारांना रोजगार, शेतकरी, शेतमजुरांच्या विकासासाठी करण्यात आलेले उपक्रम व भावी काळात राबविण्यात येणाऱ्या योजना आदी बाबींवर भर देऊन उमेदवारांनी विजयासाठी मतदारांना साकडे घातले. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली धावपळ सोमवारची पदयात्रा, रॅली व सभेने थांबविण्यात आली. लातूर शहरात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री अमित देशमुख, भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मुर्तुजा खान, शिवसेनेचे उमेदवार पप्पू कुलकर्णी यांनी पदयात्रा व सभा घेऊन शक्तीप्रदर्शन केले.
औसा येथे काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील, भाजपाचे पाशा पटेल, शिवसेनेचे दिनकर माने, शेतकरी कामगार पक्षाचे किसनराव जाधव, मनसेचे बालाजी गिरे यांनी शक्तीप्रदर्शन केले. लातूर ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. त्रिंबकनाना भिसे यांनी लातुरातच सभा घेतली. तसेच भाजपाचे रमेश कराड यांनी मुरुड येथे शक्तीप्रदर्शन करून आपल्या प्रचाराचा समारोप केला. एकंदरित, जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करून वातावरण निर्मिती केली.
कार्यकर्त्यांची यंत्रणा तत्पर...
सोमवारी सायंकाळी ६ वाजेपासून प्रचार थंडावला असला तरी रात्री उशिरापर्यंत शहरात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचे जथ्ये होते. आपापल्या प्रभागांत जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गुपचूप बैठका सुरू होत्या. मतदारांच्या सोयीसाठी अनेक कार्यकर्ते तत्परतेने रात्री उशिरापर्यंत फिरत होते. शिवाय, मंगळवारचा दिवस व पूर्ण रात्र गुपचूप प्रचारासाठी शिल्लक असल्याने कार्यकर्ते हातात कुठल्याही पक्षाचा झेंडा न घेता प्रचार करीत आहेत.
लातूर शहरात प्रभागनिहाय सर्वच पक्षांची यंत्रणा कामाला लागली आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार उमेदवारांचे विश्वासू गल्लीबोळात फिरून मतदारांना साकडे घालीत आहेत. बिअरबार व देशी दारूची दुकाने बंद असली, तरी कार्यकर्त्यांची सोय मात्र अगोदरच करून ठेवण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणच्या दुकानांतून एक खिडकी विक्री सुरू होती.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे उमेदवार अ‍ॅड. त्रिंबकनाना भिसे यांच्या प्रचारार्थ टाऊन हॉलच्या मैदानावर सभा झाली. यावेळी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांनी ‘लई भारी’ म्हणत मतदारांना साद घातली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी दुपारी १ वाजेपासून टाऊन हॉलच्या मैदानावर लातूर शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे जथ्ये मैदानावर येत होते. विलासराव देशमुख यांच्या आठवणीने सभास्थळी अनेकजण भाऊक झाले. ‘आता ही सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय, घे भरारी.. उंच आकाशी... जगूया स्वप्ने साहेबांची...’ असा आवाज टाऊन हॉलच्या मैदानावर गरजत होता. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप राठी, वैशालीताई देशमुख, आदिती देशमुख, धीरज देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतिभाताई पाटील कव्हेकर, महापौर स्मिता खानापुरे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, आ. वैजनाथ शिंदे, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख, अख्तर मिस्त्री, विद्याताई पाटील, गणेश बेळंबे, जीवन सुरवसे, संजय ओव्हळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लातूरचा विकास काँग्रेस पक्षामुळेच झाला आहे, असे ठासून सांगितले. सभास्थळी उन्ह असतानाही कार्यकर्ते मात्र बसूनच होते.

Web Title: Promotions stopped; Now secretly planning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.