इच्छुकांवरच प्रचाराचे ओझे
By Admin | Updated: October 12, 2014 00:34 IST2014-10-12T00:34:04+5:302014-10-12T00:34:04+5:30
संजय तिपाले , बीड आमदार होण्यासाठी निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या काही नेत्यांचे पक्षांकडून ऐनवेळी तिकिट कापण्यात आले़ त्यामुळे त्यांची पुरती कोंडी झाली;

इच्छुकांवरच प्रचाराचे ओझे
संजय तिपाले , बीड
आमदार होण्यासाठी निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या काही नेत्यांचे पक्षांकडून ऐनवेळी तिकिट कापण्यात आले़ त्यामुळे त्यांची पुरती कोंडी झाली;परंतु पक्षाने डावलल्याची निराशा बाजूला ठेवून नेत्यांनी प्रचारात सक्रिय होणे पसंत केले आहे़ केजमध्ये बाबूराव पोटभरे, माजलगावात रमेश आडसकर, आष्टीत बाळासाहेब आजबे, गेवराईत विजयसिंह पंडित अधिकृत उमेदवारांचे सारथी झाले आहेत़
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी वर्षभरापासूनच कंबर कसली होती तर काहींनी निवडणुकीच्या तोंडावर आपली राजकीय भूमिका बदलली होती़ उमेदवारी आपल्यालाच मिळेल या भरवशावर इच्छुकांनी मतदारसंघात संपर्क वाढवून सरावही सुरु केला होता़ बाबूराव पोटभरे यांनी भारिपमधून बाहेर पडत बहुजन विकास मोर्चाची मुहूर्तमेढ रोवली़ ते केजमधून भाजपाकडून इच्छुक होते़ रिपाइंचे पप्पू कागदे यांनीही केजमधूनच दावा केला होता़ माजलगावात मनसेकडून रेखा फड नशीब आजमावण्याच्या तयारीत होत्या़ आष्टीत भाजपाच्या बाळासाहेब आजबे यांनी दंड थोपटून सुरेश धस यांना आव्हान दिले होते़ महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपाच्या आश्रयाला गेलेले रमेश आडसकर यांनी माजलगावातून लढण्याची तयारी दर्शवली होती़ भाई गंगाभिषण थावरे यांनीही हाबूक ठोकला होता़
गेवराईत विजयसिंह पंडित यांनी स्वाभिमान जागवत बदामराव पंडित यांची अडचण वाढवली होती़ पंडितांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवून राष्ट्रवादीने ‘बॅलेन्स पॉलिटिकल’चा नवा अध्याय सुरु केला़ युती- आघाडीच्या फाटाफुटीनंतर ऐनवेळी उमेदवाऱ्या जाहीर झाल्या़ गुडघ्याला बाशिंग बांधून जे तयार होते त्यांचे ऐनवेळी पंख छाटल्याने काही ठिकाणी बंडाच्या रुपाने नाराजी उफाळून आली़ माजलगाव, केज, आष्टीत भाजपाने ‘पॅचअप’ केले;परंतु माजलगावात राष्ट्रवादीला बंडाळी रोखता आली नाही़ तेथे प्रकाश सोळंकेंना स्वपक्षीयांतील नेत्यांनीच घेरले आहे़
दरम्यान, इच्छुक म्हणून उमेदवारीच्या स्पर्धेत असणारेच आता प्रचाराची धुरा पेलत आहेत़ ‘निसटा नव्हे तर निष्ठा’ महत्त्वाची समजून काहींनी स्वत:ला प्रचारात झोकून दिले आहे़ आपल्या आशा, आकांक्षा गुंडाळून ठेवत पक्षासाठी हे नेते जोमाने कामाला लागल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांचे ‘टेंशन’ वाढले आहे़ आष्टीत भीमराव धोंडे यांच्या खांद्याला खांदा लावून बाळासाहेब आजबे यांनी प्रचाराची राळ उडवली आहे़ गेवराईत जि़प़ अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी बदामराव पंडित यांच्यासाठी जोर लावला आहे़ रमेश आडसकर यांनीही केजमध्ये भाजपाच्या उमेदवार प्रा़ संगीता ठोंबरे तर माजलगावात आऱ टी़ देशमुख यांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे़
गंगाभिषण थावरे हे देखील आऱ टी़ देशमुख यांच्या प्रचारात सिंहाचा वाटा उचलत आहेत़ बहुजन विकास मोर्चाचे प्रमुख बाबूराव पोटभरे यांनीही प्रा़ संगीता ठोंबरे यांना निळ्या वादळाची ताकद दिली आहे़ माजलगावात आऱ टी़ देशमुख यांच्यासाठीही त्यांनी ‘टाईट फिल्डींग’ लावली आहे़ राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार पृथ्वीराज साठे यांचे नाव उमेदवारीच्यास्पर्धेत शेवटपर्यंत होते;पण त्यांना थांबवून पक्षाने नमिता मुंदडा यांच्यावर विश्वास दाखवला़ आता साठे प्रचारात जीवाचे रान करीत आहेत़
बीडमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब जटाळ, दिलीप भोसले यांनी तर अपक्ष उमेदवारी दाखल केली होती;परंतु सिराजोद्दीन देशमुख यांच्यासाठी त्यांनी बंडाचे झेंडे गुंडाळून ठेवले़ देशमुख यांच्या प्रचारासाठी ते रात्रंदिवस फिरत आहेत़
मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रेखा फड माजलगावातून इच्छुक होत्या़ त्यांच्याऐवजी पक्षाने डॉ़ भगवान सरवदे यांना संधी दिली़ त्यामुळे फड नाराज आहेत़
४गेवराई वगळता इतर कोठेही त्या प्रचारासाठी गेल्या नाहीत़ निलंगा, मुंबई, जालना, औरंगाबाद येथील उमेदवारांच्या प्रचारात त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे़
४रिपाइंचे पप्पू कागदे हे मुुंबई मुक्कामी आहेत़ त्यांचे कार्यकर्तेही प्रचारात दिसत नाहीत़