प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता वैयक्तिक भेटींवर ‘विशेष’ भर
By Admin | Updated: April 17, 2017 23:35 IST2017-04-17T23:32:47+5:302017-04-17T23:35:07+5:30
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता थंडावल्या.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता वैयक्तिक भेटींवर ‘विशेष’ भर
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता थंडावल्या. गेल्या १५ दिवसांपासून तळपत्या उन्हात प्रचार सभा, रॅली, पदयात्रा, रोड शो काढून उमेदवारांनी धुराळा उडवून दिला होता. काँग्रेस, भाजपा, परिवर्तन आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचाराची राळ उडविली होती. अखेर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास प्रचाराच्या तोफा थंडावल्या. दरम्यान, १९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत मतदान होणार आहे.
महानगरपालिकेच्या एकूण १८ प्रभागांतील ७० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सभा, कॉर्नर बैठका, गृहभेटी, पदयात्रा काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सभांचा आणि प्रचारफेऱ्यांचा माहोल होता. गेल्या १५ दिवसांत काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक सभा घेण्यात आल्या. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, अली अझिझी, बसवराज पाटील आदींनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेऊन प्रचारात रंगत आणली. तसेच सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनीही काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो घेऊन काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रचार यंत्रणा राबविली. भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, शहानवाज हुसेन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपा-रिपाइं उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात ठिकठिकाणी सभा घेतल्या. एकूण १८ प्रभाग असलेल्या लातूर शहरात या नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा झाल्या. अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सभा झाली. यावेळी भाजपाच्या सर्वच उमेदवारांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र विकास आघाडी, एमआयएम, शेतकरी संघटनेच्या परिवर्तन आघाडीनेही लातूर शहरात प्रचाराची राळ उठविली. परिवर्तन आघाडीचे एकूण ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एमआयएमचे संस्थापक खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या दोन सभा निवडणूक प्रचारकाळात झाल्या. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीही एक जाहीर सभा झाली होती. ओवेसी यांनी लातूर शहरात दोन सभा व दोनवेळा रोड शो घेऊन मतदारांना परिवर्तन आघाडीकडे वळविण्याचा प्रयत्न केला. आ. इम्तियाज जलील, अॅड. आण्णाराव पाटील आदींनी या उमेदवारांच्या प्रचारासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)