समलिंगी संबंधातून प्राध्यापकाचा खून
By Admin | Updated: March 26, 2016 23:59 IST2016-03-26T23:59:26+5:302016-03-26T23:59:26+5:30
औरंगाबाद : बजाजनगर परिसरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या खुनाचे कारण अखेर उघडकीस आले. समलिंगी संबंधातून हा खून करण्यात आला होता

समलिंगी संबंधातून प्राध्यापकाचा खून
औरंगाबाद : बजाजनगर परिसरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या खुनाचे कारण अखेर उघडकीस आले. समलिंगी संबंधातून हा खून करण्यात आला होता. प्राध्यापकाकडून संबंध ठेवण्यासाठी सतत ब्लॅकमेलिंग केल्या जायचे. त्यामुळे त्याचा पिच्छा सोडविण्यासाठी आरोपी राजेश जाधवने दोन साथीदारांच्या मदतीने हा निर्घृण खून केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाल्याचे करमाड ठाण्याचे सहायक निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजेश जाधव (२२, रा. न्यू हनुमाननगर, गल्ली नंबर ४), विशाल गायके (रा. मांडकी) व संदीप दाभाडे (रा. मुरूमखेडा, बदनापूर, जालना) यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, मयत शिवाजी अर्जुन खरात (३१, रा. बीड बायपास परिसर) हे १९ मार्च रोजी बेपत्ता झाले. दोन दिवस शोध घेतल्यानंतरही त्यांचा थांगपत्ता लागेना. शेवटी घरच्यांनी २१ मार्च रोजी पुंडलिकनगर पोलीस चौकी गाठली आणि शिवाजी खरात हे बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.
दरम्यान, औरंगाबाद तालुक्यातील आडगाव माहुली येथील पाझर तलावात एका तरुणाचे प्रेत २० मार्च रोजी आढळून आले. प्रेत विवस्त्र होते. त्याचे हात-पाय तोडलेले होते, शिल्लक असलेले धडही अर्धवट जाळलेले होते. अत्यंत निर्घृणपणे हा खून करण्यात आला होता. तिकडे अनोळखी तरुणाचे प्रेत सापडल्याचे समजताच पुंडलिकनगर चौकीचे जमादार विष्णू मुंडे यांनी तपास केला. तेव्हा ते प्रेत बेपत्ता प्राध्यापक शिवाजी खरातचे असल्याचे अखेर स्पष्ट झाले. या खून प्रकरणानंतर करमाड ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मग पोलिसांनी तपासाची चके्र फिरविली. तेव्हा मयत हा १९ मार्चला शेवटी त्याचा मित्र असलेल्या राजेश जाधवला भेटण्यासाठी गेलेला होता, हे समोर आले. पोलिसांनी लागलीच राजेशच्या घरी छापा मारला; परंतु तो घटना घडली त्या दिवसापासून घरातून बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यामुळे राजेशचा या खुनामागे हात आहे हे स्पष्ट झाले. लगेच राजेशचा शोध सुरू झाला. सहायक निरीक्षक चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करमाडचे पोलीस पथक आरोपीच्या शोधार्थ अखेर गोव्यात पोहोचले. तेथे राजेश आणि त्याचा साथीदार विशाल गायके हे शुक्रवारी पोलिसांच्या हाती लागले. ‘खाक्या’ दाखविताच राजेशने साथीदार विशाल आणि संदीप दाभाडेच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली. (पान २ वर)