युवक महोत्सवातून व्यावसायिक कलावंत घडावेत
By Admin | Updated: December 17, 2014 00:37 IST2014-12-17T00:27:14+5:302014-12-17T00:37:56+5:30
औरंगाबाद : कोणत्याही व्यवसायात असलेली असुरक्षितता कलेच्या व्यवसायातही मोठी आहे. वशिलेबाजी किंवा ‘गॉडफादर’मुळे कोणताही कलावंत यशस्वी होत नाही.

युवक महोत्सवातून व्यावसायिक कलावंत घडावेत
औरंगाबाद : कोणत्याही व्यवसायात असलेली असुरक्षितता कलेच्या व्यवसायातही मोठी आहे. वशिलेबाजी किंवा ‘गॉडफादर’मुळे कोणताही कलावंत यशस्वी होत नाही. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही, तर बुद्धिमत्तेला प्रगल्भतेची जोड आणि कलेचे सातत्य हवे, असा विश्वास प्रसिद्ध सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी याने व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. या समारंभास सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी याची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते. व्यासपीठावर नलिनी चोपडे, कुलसचिव डॉ. धनराज माने व त्यांच्या पत्नी कमल माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अशोक मोहेकर, अधिष्ठाता डॉ. उल्हास शिंदे, लेखा व वित्त अधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेचे सचिव नामदेव कचरे, विद्यापीठ विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष लखनलाल भुरेवाल, सचिव माधुरी मिरकर, सल्लागार समितीचे सदस्य प्रा. संभाजी भोसले, प्रा. दिलीप बडे, प्रा. गजानन सानप, डॉ. राजेश करपे व डॉ. फुलचंद सलामपुरे आदींची उपस्थिती होती.
स्वागत समारंभ आटोपल्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष लखनलाल भुरेवाल याने मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार कुलगुरू व कुलसचिवांनी त्याला बोलण्यास पाचारण केले. भुरेवाल याने बोलताना ‘निवडून आलेल्या आम्हा विद्यार्थी प्रतिनिधींना सातत्याने डावलले जाते. हा महोत्सव अगोदर झाला असता तर यातील यशस्वी कलावंत विद्यार्थ्यांना इंद्रधनुष्य युवक महोत्सवात जाण्याची संधी मिळाली असती.’ असा सूर आळवला. तो म्हणाला की, आम्ही विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लोकशाही पद्धतीने निवडून आलो. आम्ही प्रशासनाकडे सातत्याने ‘केबिन’ व ‘व्हिजिटिंग’ कार्डची मागणी केली; पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. हाच धागा पकडत सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी याने आपल्या भाषणाला सुरुवात केली. तो म्हणाला की, ‘इंद्रधनुष्य युवक महोत्सवात जाण्याची विद्यार्थी कलावंतांची संधी हुकली ते योग्य नाही. याबद्दल विद्यापीठ प्रशासनाच्या काय अडचणी असतील, ते मला माहिती नाही. राजकारणाबद्दल मला नितांत आदर आहे. तुम्ही जर लोकप्रतिनिधी आहात, तर लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केबिन व व्हिजिटिंग कार्डाची गरज कशाला हवी मी जर विद्यार्थी प्रतिनिधी आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यालाच माझे पहिले प्राधान्य हवे; पण मित्रा तू पहिला केबिन व कार्डाचा मुद्दा मांडलास. अशा युवक महोत्सवातून अनेक बक्षिसे मिळत असतात. बक्षिसांनी हुरळून जाऊ नका. बक्षिसे हा केवळ उपचार असतो. किती बक्षिसे मिळाली, कोणती बक्षिसे मिळाली, हे आपणास आठवत नसते. मात्र, मी त्या दिवशी काय शिकलो, हे माणूस कधीही विसरूशकत नाही. कुठल्या एखाद्या कलेची आवड असणे, ती कला आपणाला खरोखर येणे व त्या कलेचा व्यवसाय करणे, या गोष्टी भिन्न आहेत. कलेच्या क्षेत्रात ८० टक्के अपयश आहे. या क्षेत्रात रसिकांनी स्वीकारले, तरच तो कलावंत यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले, तर डॉ. सुधाकर शेंडगे यांनी आभार मानले.
विद्यापीठाने पटकाविली १३ पारितोषिके
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात झालेल्या चारदिवसीय केंद्रीय युवक महोत्सवामध्ये ग्रामीण भागातून तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा संघ सर्वोत्कृष्ट ठरला, तर शहरी भागातून देवगिरी महाविद्यालयाचा संघ सर्वोत्कृष्ट ठरला. या दोन्ही विद्यालयांच्या सर्वोत्कृष्ट संघांना विद्यापीठाच्या वतीने सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी याच्या हस्ते फिरते चषक व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, या महोत्सवात विद्यापीठाच्या संघांनी विविध १३ पारितोषिके पटकाविली.
१३ डिसेंबरपासून युवक महोत्सवाला प्रारंभ झाला. विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या विविध ६ भव्य रंगमंचांवर तब्बल ३६ कला प्रकारांचे सादरीकरण झाले. यामध्ये संलग्नित २२५ महाविद्यालयांच्या जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी याच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवारी सकाळी या महोसत्वाचा समारोप झाला. शास्त्रीय गायन स्पर्धेत शासकीय विज्ञान संस्थेच्या संघाने प्रथम, देवगिरी महाविद्यालयाने द्वितीय, तर माजलगाव येथील सिद्धेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने तृतीय पारितोषिक पटकावले.
भारतीय सुगम गायन स्पर्धेत स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाने प्रथम, बीडच्या के.एस. के. महाविद्यालयाने द्वितीय, तर देवगिरी महाविद्यालयाने तृतीय पारितोषिक प्राप्त केले. समूह गायन स्पर्धेत कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाने प्रथम, शिवछत्रपती, स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाने विभागून द्वितीय व अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
आदिवासी नृत्य स्पर्धेत गेवराई तालुक्यातील गढी येथील जयभवानी शिक्षण संचलित महाविद्यालयाने प्रथम पारितोषिक, तर उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस व विद्यापीठाला द्वितीय पारितोषिक विभागून तसेच बीडचे के. एस.के. व विवेकानंद महाविद्यालयाला तृतीय पारितोषिक विभागून मिळाले.
उत्कृष्ट स्त्री अभिनयाचे पारितोषिक भक्ती मस्के हिला, द्वितीय पारितोषिक यशोदा आहेर व तृतीय पारितोषिक ज्योती काळे यांना मिळाले.
उत्कृष्ट पुरुष अभिनयाचे प्रथम पारितोषिक गजमल भागवत याने, द्वितीय पारितोषिक अमोल टरगाळ याने, तर तृतीय पारितोषिक रामेश्वर झिंझुर्डे याने पटकाविले.
वादविवाद स्पर्धेत बीड येथील वसंतराव काळे जर्नालिझम कॉलेज, द्वितीय पारितोषिक देवगिरी महाविद्यालय, तर तृतीय पारितोषिक जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालयाने पटकावले. विवेकानंद महाविद्यालयाने लावणी नृत्यामध्ये पहिले पारितोषिक पटकाविले, तर पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाने दुसरे व घाटनांदूरच्या वसुंधरा महाविद्यालयाने तृतीय पारितोषिक मिळविले.