ब्रोकोलीतून मिळविले लाखाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:43+5:302020-12-17T04:28:43+5:30

गल्ले बोरगाव : खुलताबाद तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी पोपटराव वाकळे यांनी शेडनेटमध्ये ब्रोकोलीचे उत्पादन घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले ...

Production of lakhs obtained from broccoli | ब्रोकोलीतून मिळविले लाखाचे उत्पादन

ब्रोकोलीतून मिळविले लाखाचे उत्पादन

गल्ले बोरगाव : खुलताबाद तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी पोपटराव वाकळे यांनी शेडनेटमध्ये ब्रोकोलीचे उत्पादन घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. सोबतच रेड फ्लॉवरची लागवड वीस गुंठ्यांत करून त्यांनी अनोखा प्रयोग केला. या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी आत्मा, कृषी विभाग पुणे यांच्या वतीने व्हीएचटीपी प्रशिक्षण देण्यात आले. प्रयोगशील शेतकरी म्हणून वाकळे यांनी परिसरात नावलौकिक मिळविला आहे.

शेतकरी वाकळे यांच्याकडे चार एकर जमीन आहे. त्यावर त्यांनी शेडनेट उभारणी केली. त्यासाठी कृषी विभागामार्फत अनुदानही मिळाले. शेडनेटमध्ये सिमला मिरची तसेच ब्रोकोली व रेड कॅबेज अशा विविध पिकांमधून उत्पन्न घेण्याचे ठरवले. प्रथम दहा गुंठे क्षेत्रात ब्रोकोली लागवड केली; परंतु विक्री हा मोठा विषय असल्यामुळे त्यांना विक्रीसाठी थोड्या अडचणी निर्माण झाल्या. त्यासाठी जाहिरात तसेच ग्राहकांमध्ये जागृती करण्यासाठी ब्रोकोलीची माहिती पत्रके तयार केली. शहरातील सर्व मॉल तसेच मोठे किराणा व भाजीपाला विक्रेते यांच्या भेटी घेऊन त्यांना ब्रोकोलीचे महत्त्व समजावून सांगितले.

सुरुवातीच्या दहा गुंठे क्षेत्रात अवघ्या तीन महिन्यांमध्ये शेडनेट व विक्री व्यवस्थापन व्यवस्थित केल्यामुळे ब्रोकोलीची विक्री एक लाख दहा हजारांपर्यंत केली. लागवडीपासून काढणी व विक्रीपर्यंत आलेला खर्च तीस हजारांपर्यंत आला. म्हणजेच निव्वळ नफा ८० हजार मिळाला. त्यामुळे लाल गोबी व ब्रोकोलीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. शेडनेटमधील शेतीद्वारे आर्थिक क्षमता निश्चित वाढू येऊ शकते. या सर्व उपक्रमासाठी आत्मा कृषी विभागाचे सहकार्य मिळाले.

कृषी संचालकांनी केली पाहणी

विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन हा उपक्रम अजून एकत्रित शेडनेटधारक शेतकऱ्यांना करावा, असे आवाहन करून गट समूहाने शेती करा, अशी सूचनाही केली. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, तालुका कृषी अधिकारी विजय नरवडे, मंडळ कृषी अधिकारी वैशाली पवार, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रदीप पाठक व पल्लवी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

फोटो.................... -

Web Title: Production of lakhs obtained from broccoli