गुणवत्तेच्या प्रवासाला गरिबीची अडचण !
By Admin | Updated: June 22, 2014 00:06 IST2014-06-21T23:55:11+5:302014-06-22T00:06:44+5:30
हरी मोकाशे , लातूर ंआर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असली तरी त्यावर मात करीत जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण ९६़२० टक्के गुण घेऊन पूर्ण करीत अक्रमने गरुडझेप घेतली आहे़

गुणवत्तेच्या प्रवासाला गरिबीची अडचण !
हरी मोकाशे , लातूर
ंआर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असली तरी त्यावर मात करीत जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण ९६़२० टक्के गुण घेऊन पूर्ण करीत अक्रमने गरुडझेप घेतली आहे़ त्याच्या गुणवत्तेच्या प्रवासाला आता आर्थिक अडचणीची खीळ बसली आहे, ती गरिबीची़ त्यामुळे पुढील शिक्षण घेऊन मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचे कसे? असा यक्षप्रश्न अक्रम आणि त्याच्या पालकासमोर उभा राहिला आहे़
शहरातील हत्तेनगरात भाड्याच्या घरात अक्रम गौस सय्यद राहतो़ त्याचे माध्यमिकचे शिक्षण शहरातील ज्ञानेश्वर विद्यालयात झाले असून नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात त्याने ९६़२० टक्के गुण घेऊन गरुडझेप घेतली आहे़ अक्रमची परिस्थिती अत्यंत बिकट आहे़ शहरातील सुभाष चौक परिसरात वडिलांचा पानटपरीचा व्यवसाय आहे़ कुटुंबात अक्रमसह अन्य तीन लहान भावंडे असल्याने दररोजची कमाई ही दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि घरचे भाडे भरण्यासाठीच खर्च होत आहे़
दहावीतील अक्रमला शिक्षणासाठी पैसा कमी पडत असल्याने त्याच्या वडिलांनी पतसंस्थेचे कर्जही काढले आहे़ वडींल घेत असलेल्या कष्टाची आणि गरिबीची जाणीव असलेल्या अक्रमने दररोज तीन ते चार तास अभ्यास करून दहावी परीक्षेत यश संपादन केले आहे़ विशेष म्हणजे वडिलांना व्यवसायात त्याची मोठी मदत होत आहे़ त्यामुळे त्याच्या वडिलाचे स्वप्न साकार होण्यास सुरुवात होत असली तरी मुलाचे उच्च माध्यमिकचे शिक्षण कसे पूर्ण करायचे असा प्रश्न त्यांना सतत भेडसावत आहे़ एवढे गुण घेतलेल्या मुलास चांगल्या संस्थेत शिक्षण देण्याची ऐपत नाही याची त्यांच्या मनात सतत सल टोचत आहे़ मुलगा गुणवान असूनही केवळ निर्धरन असल्याने त्याचे भवितव्य कसे घडेल याची कुटुंबियांसमोर चिंता निर्माण झाली आहे़ स्वत: अक्रमही याच चिंतेने अस्वस्थ असून आता कोण दाखविल आयुष्याला पुढची वाट अशा आशेवर तो उभा आहे़
मुलाचे शिक्षण पूर्ण करणार...
आम्ही स्वत:चे नाव लिहिण्यापुरते साक्षर असलो तरी मुलगा दररोज कितीवेळ अभ्यास करीत असतो? त्याला अवघड वाटणारा विषय कोणता? त्याचा आवडता विषय कोणता हे विचारण्यासाठीही मला वेळ मिळत नाही़ घरातील मंडळींकडूनच तो दररोज अभ्यास करतो का? याची नेहमी चौकशी करीत असत़
आपल्या अभ्यासाबरोबर माझ्या व्यवसायातही त्याची मदत आहे़ कितीही कर्ज झाले तरी त्याचे शिक्षण पूर्ण करणार असल्याचे त्याचे वडील गौस सय्यद यांनी सांगितले़
मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचंय़़़
माझी परिस्थिती हलाखीची असली तरी पुढील शिक्षण घेण्याची जिद्द आहे़ त्यासाठी वेळप्रसंगी आपण स्वत: काम करुन शिक्षण पूर्ण करणार आहे़ मला मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचं आहे, असे अक्रम सय्यद याने सांगितले़