१३७ गुणवंतांना पारितोषिकांचे वाटप
By Admin | Updated: June 27, 2014 01:04 IST2014-06-27T00:55:25+5:302014-06-27T01:04:50+5:30
औरंगाबाद : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्ता विकास योजनेंतर्गत मनपाच्या ७७ शाळांमधील विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या १३७ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

१३७ गुणवंतांना पारितोषिकांचे वाटप
औरंगाबाद : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्ता विकास योजनेंतर्गत मनपाच्या ७७ शाळांमधील विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या १३७ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
महापौर म्हणाल्या, मनपा शाळेत गरिबांची मुले शिकतात. यावर्षी चांगला निकाल लागला आहे. येथून ही परंपरा कायम राहिली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून पारितोषिके देण्यात आली आहेत. पालकांनी त्या रकमेचा योग्य वापर करावा. ती रक्कम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच खर्च होईल, याची काळजी घ्यावी. उपमहापौर संजय जोशी म्हणाले, श्रीमंतांच्या मुलांना सर्व सुविधा मिळतात. मनपा शाळेतील मुलांनी त्या तुलनेत मोठे काम केले आहे.
सभागृह नेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक करताना आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, मनपाने मागासवर्गीयांसह सर्व विद्यार्थ्यांना गणवेश दिले. शिक्षणासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून दिला. यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी शाळेची गुणवत्ता वाढेल. मिलिंद दाभाडे आणि शे.फरिना राज महंमद यांनी आयुक्त, शिक्षक, सराव वर्ग, परीक्षा, प्रश्नसंच अपेक्षित, संगणक कक्ष, व्हॅकेशनमुळे यश मिळाल्याचे मनोगतामध्ये सांगितले. मुकुंदवाडी, शहाबाजार, प्रियदर्शिनी इंदिरानगर, मिटमिटा या शाळांना महापौरचषक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, गटनेते गजानन बारवाल, सभापती कमल नरोटे, सविता सुरे, नगरसेविका रेखा जैस्वाल, प्राजक्ता भाले, उपायुक्त पेडगावकर, रवींद्र निकम, शिक्षणाधिकारी ए. एम. शेख व विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती होती.
१७ लाखांची पारितोषिके
दाभाडेला ७५ हजार रुपयांचे पारितोषिक, तर उर्वरित ८० ते ८४ टक्क्यांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ५० हजार, ७५ ते ८० टक्के मिळविणाऱ्यांना ३५ हजार, ७० ते ७५ टक्के मिळविणाऱ्यांना २० हजार आणि ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. १७ लाख रुपयांची ती रक्कम होती.