तलाठ्यासह खासगी लेखनिक जेरबंद
By Admin | Updated: October 12, 2014 00:42 IST2014-10-12T00:42:10+5:302014-10-12T00:42:10+5:30
वाशी : शेत जमिनीचा फ ेर ओढण्यासाठी खासगी लेखनिकामार्फत दोन हजार रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई

तलाठ्यासह खासगी लेखनिक जेरबंद
वाशी : शेत जमिनीचा फ ेर ओढण्यासाठी खासगी लेखनिकामार्फत दोन हजार रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई शनिवारी सायंकाळी वाशी येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली़
पोलिसांनी सांगितले की, वाशी येथील तक्रारदाराने वाटणीपत्राआधारे शेतजमीन दोन मुले, पत्नीला वाटून दिली होती़ त्यानुसार फेरफार ओडून सातबारा मिळावा, यासाठी मुलाच्या नावाने त्यांनी वाशी तलाठी सज्जाचे तलाठी माधव पिराजी शिरमोड यांच्याकडे अर्ज दिला होता. जमिनीचा फेर ओढण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवावा लागतो व तो पाठवण्यासाठी चार हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी तलाठी शिरमोड यांनी तक्रारदाराकडे केली. त्यानंतर तक्रारदाराने उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दिली होती़ या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ़ स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी वाशी येथील तलाठी कार्यालयात शनिवारी सायंकाळी सापळा रचला़ ठरलेल्या चार हजार रूपये लाचेच्या मागणीपैकी तक्रारदाराकडून खासगी लेखनिक तुकाराम पांडुरंग शिंदे याच्या मार्फत दोन हजार रूपये तलाठी माधव शिरमोड यांनी स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ ही कारवाई उपाधीक्षक अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक आशिफ शेख, जमादार दिलीप भगत, चनशेट्टी, पोलीस नाईक बालाजी तोडकर, सुधीर डोरले, नितीन सुरवसे, राहूल नाईकवाडी,चालक चिखलीकर यांच्या पथकाने केली़ या कारवाईमुळे महसूलमधील लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)