खाजगी पाणीपुरवठ्याचे चटके सुरू
By Admin | Updated: September 6, 2014 00:42 IST2014-09-06T00:36:37+5:302014-09-06T00:42:27+5:30
औरंगाबाद : महापालिकेने शहर पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करून पाच दिवस उलटत नाहीत तोच नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.

खाजगी पाणीपुरवठ्याचे चटके सुरू
औरंगाबाद : महापालिकेने शहर पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करून पाच दिवस उलटत नाहीत तोच नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. कंपनी ३ वर्षांपासून शहरात काम करीत असल्याचा दावा मनपाने आजवर केला. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ३ वर्षांत फक्त डाटा संकलन केल्याचे आज सांगितले. शहरातील जलवितरण यंत्रणा कशी हे समजण्यासाठी १ महिन्याचा अवधी कंपनीला हवा आहे. पालिकेचे अधिकारी कंपनीला सहकार्य करीत आहेत. मात्र, लाईनमन अजून कंपनीला सहकार्य करीत नसल्याचे आज समोर आले.
गुंठेवारीतील टँकर आणि जनकल्याण म्हणून पाठविण्यात येणारे मोफत टँकर्स ठेकेदाराने बंद केल्यामुळे आगामी काळात पाणी चांगलेच पेटणार आहे. पाण्याचा कॉर्पाेरेट धंदा सुरू झाला असून, सगळे काही हायटेक असल्याचा दावा करीत शहराची पाणीपुरवठा व्यवस्था ताब्यात घेतलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे व्यवसाय प्रमुख गौरीशंकर बासू, व्ही. बी. शिवांगी, वसुली अधिकारी विधान चौधरी यांनी केला. उपमहापौर संजय जोशी यांच्या दालनात सिडको-हडको, उल्कानगरी परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार केली. सर्व भाजपाच्या नगरसेवकांनी कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून समन्वय व संवाद यंत्रणा विकसित करण्यासाठी गरमागरम चर्चा केली. यावेळी गटनेता संजय केणेकर, नगरसेवक बालाजी मुंडे, बबन नरवडे, रामचंद्र नरोट, नितीन चित्ते, नगरसेविका साधना सुरडकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता वसंत निकम, आय. बी. ख्वाजा यांची उपस्थिती होती.
एन-७ जलकुंभावर मिसारवाडीतील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. १२ टँकर मनपाने मोफ त सुरू ठेवले होते. ते बंद करण्यात आले. त्यानंतर पैसे भरून जे टँकर सुरू होते तेही बंद झाले. त्यामुळे भारिपचे महेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जलकुंभावर हंडा मोर्चा काढण्यात आला. संदीप कंठे, कल्याण गायकवाड, महेंद्र राऊत, युनूस शेख, शे.मुसा आदींसह शेकडो महिलांची उपस्थिती होती.
उल्कानगरी वॉर्डामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जलवाहिनीचे कामही ठप्प पडलेले आहे. उपमहापौरांच्या दालनात वॉर्डातील नागरिकांनी पाण्याची मागणी केली. जवाहर को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि. मध्ये कमी वेळ पाणी येते. लाईनमन येऊन पाहणी करून जातो. वेदांतनगरचे नाव सांगून मनपा अधिकारी सोसायटीला कमी दाबाने पाणी देतात. याप्रकरणी सोसायटीने आयुक्तांना निवेदन दिले आहे.