किलेअर्क कोविड सेंटरमधून पळून गेलेला कैदी ६ महिन्यानंतर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:27 IST2020-11-12T07:27:57+5:302020-11-12T07:27:57+5:30

खुनाचा आरोप असलेले न्यायाधिन दोन कैद्यांनी किलेअर्क कोविड सेंटरमधून ८ जून रोजी पलायन केले होते. यापैकी एकाला यापूर्वीच अटक ...

The prisoner, who escaped from the Kilearc Covid Center, was caught six months later | किलेअर्क कोविड सेंटरमधून पळून गेलेला कैदी ६ महिन्यानंतर पकडला

किलेअर्क कोविड सेंटरमधून पळून गेलेला कैदी ६ महिन्यानंतर पकडला

खुनाचा आरोप असलेले न्यायाधिन दोन कैद्यांनी किलेअर्क कोविड सेंटरमधून ८ जून रोजी पलायन केले होते. यापैकी एकाला यापूर्वीच अटक केली होती. अक्रम खान गयासखान (३०, रा. जटवाडा ) असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे.

छावणी परिसरात दोन वर्षांपूर्वी झालेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला अटक झाली होती. जून महिन्यात हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील २९ कैद्यांना कोरोनाची लागण झाली. यात अक्रम खानचा समावेश होता. या कैद्यांना किलेअर्क येथील कोविड सेंटरमध्ये रूपांतरित केलेल्या तात्पुरत्या जेलमध्ये ठेवून उपचार केले जात होते. ८ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अक्रम खान आणि अन्य एका कैद्याने जेलमधून धूम ठोकली होती. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गुन्हे शाखा आणि बेगमपुरा पोलीस फरार कैद्यांचा शोध घेत होते. अक्रम खानचा साथीदार मात्र आठ दिवसांत पोलिसांच्या हाती लागला होता. अक्रम मात्र पोलिसांना चकमा देत होता. तो मालेगावला राहतो आणि मुजीब कॉलनीतील सासुरवाडीत पत्नीला भेटायला येतो, अशी माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. मंगळवारी पहाटे तो येणार असल्याचे कळताच पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे आणि अन्य कर्मचारी यांना सोबत घेऊन रात्रीपासून सापळा रचला. पहाटे ४:१५ वाजेच्या सुमारास अक्रम कारने मुजीब कॉलनीत येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. पोलिसांना हिसका देऊन तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या काही फुटावर त्याला पकडले.

Web Title: The prisoner, who escaped from the Kilearc Covid Center, was caught six months later