नागद : बेलखेडा (ता. कन्नड) गावात टेलरिंग काम करणाऱ्या एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संजय शिवराम वानखेडे-पाटील (५०) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे मूळ गावी झालेल्या एका भांडणात आरोपी म्हणून वानखेडे हे नाशिक तुरुंगात सजा भोगत होते. मागील आठवड्यात कोरोनामुळे शासनाने कैद्यांना सुटी दिली होती. गावात आल्यानंतर पाटील यांनी आठव्याच दिवशी आयुष्य संपविले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय पाटील हे मूळचे पाथरी (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील आहेत. ते टेलरिंग व्यवसायानिमित्त बेलखेडा येथे स्थायिक झाले. मूळ गावी झालेल्या भांडणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात त्यांनी दोषी ठरल्यानंतर त्यांना नाशिक तुरुंगात रवाना केले गेले. कोरोनामुळे राज्यातील कैद्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे संजय यांनादेखील सुटी मिळाली. सुटी मिळून आठ दिवस होत नाही तोच त्यांनी बेलखेडा येथील शेतशिवारात गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी शेतकरी डॉ. पांडुरंग सूर्यवंशी हे त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या शेतात लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी नागद पोलीस चौकीत माहिती दिली. जमादार पंढरीनाथ इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल सूर्यकांत भामरे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागद आरोग्य केंद्रात पाठविला. डॉ. संजय मुळे यांनी उत्तरीय तपासणी केली. पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील नेवसे, जमादार पंढरीनाथ इंगळे हे करीत आहेत.