पॅरोलवर सुटलेले कैदी फरार; शोध सुरू

By Admin | Updated: July 4, 2014 00:13 IST2014-07-03T23:17:14+5:302014-07-04T00:13:09+5:30

बीड: नाशिक कारागृहातून पॅरोलच्या रजेवरुन परत न आलेल्या गेवराई तालुक्यातील दोन कैद्यांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prisoner absconding; Start searching | पॅरोलवर सुटलेले कैदी फरार; शोध सुरू

पॅरोलवर सुटलेले कैदी फरार; शोध सुरू

बीड: नाशिक कारागृहातून पॅरोलच्या रजेवरुन परत न आलेल्या गेवराई तालुक्यातील दोन कैद्यांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परळीत एका कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण चार कैद्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शंकर विठ्ठल कांबळे असे त्या कैद्याचे नाव असून तो गेवराई तालुक्यातील देवपिंपरी येथील रहिवासी आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयाने शंकर कांबळे यास २७ आॅगस्ट २००४ रोजी एका खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो नाशिक येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याची वर्तणूक चांगली असल्याने विभागीय आयुक्त नाशिक यांच्या आदेशानुसार १५ मे २०१२ रोजी ३० दिवसाकरीता पॅरोल मंजूर करण्यात आली होती. सदर रजा भोगून १४ आॅगस्ट २०१२ पर्यंत हजर होणे आवश्यक होते परंतु तो अद्याप परतला नाही. दुसरा आरोपी हा गेवराई येथील रहिवासी असून त्याचे नावे अर्जुन शंकर कांबळे असे त्याचे नाव आहे. आर्जुन यास बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने एका प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगत असताना त्यास विभागीय आयुक्त नाशिक यांनी १५ नोव्हेंबर २००५ रोजी तीस दिवसाकरिता रजा मंजूर केली होती. मात्र तो रजा संपल्यानंतरही कारागृहात परतला नाही. पॅरोची रजा संपूनही न परतलेल्या शंकर विठ्ठल कांबळे व अर्जुन शंकर कांबळे यांच्या विरुद्ध नाशिक कारागृहाचे कारागृह रक्षक राजाभाऊ रंगनाथ परळकर यांच्या फिर्यादीवरुन गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय पवार, पोहेकॉ आदमुने करीत आहेत.
तिसरा कैदी हा परळी येथील आझादनगर भागातील रहिवासी आहे. सय्यद खालेद सय्यद लियाकत असे त्याचे नाव आहे. सय्यद खालेद सय्यद लियाकत यास कारागृह उपमहानिरीक्षक विभाग औरंगाबाद यांच्या आदेशानुसार २० मे २००९ रोजी संचित रजेवर सोडण्यात आले होते. हा बंदी १५ जुलै २००९ रोजीपर्यंत कारागृहात परतायला हवा होता. मात्र तो परतला नाही. परळकर यांच्या फिर्यादीवरुन सय्यद खालेद सय्यद लियाकत याच्याविरुद्ध परळी ५ शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)
संचित रजेचा असाही दुरुपयोग
कारागृहामध्ये चांगली वर्तवणूक केल्यामुळे कैद्यांना पॅरोलवर एक महिन्याची रजा मंजूर करण्यात येते. मात्र याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. पॅरोलवरुन न परतलेल्या कैद्यांची संख्या जवळपास १९ आहे. सुविधेचा गैरफायदा घेतलेल्या कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Web Title: Prisoner absconding; Start searching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.