कम्युनिटी पोलिसिंगला प्राधान्य

By Admin | Updated: May 26, 2015 00:52 IST2015-05-26T00:41:25+5:302015-05-26T00:52:41+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासोबतच कम्युनिटी पोलिसिंग करण्यावर आपला भर देणार असल्याचे औरंगाबाद ग्रामीण दलाचे नवे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले

Priority to community policing | कम्युनिटी पोलिसिंगला प्राधान्य

कम्युनिटी पोलिसिंगला प्राधान्य


औरंगाबाद : जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासोबतच कम्युनिटी पोलिसिंग करण्यावर आपला भर देणार असल्याचे औरंगाबाद ग्रामीण दलाचे नवे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. रेड्डी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.
जनतेची कामे झाली पाहिजेत
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जावी, असे स्पष्ट आदेश जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. शिवाय तक्रार अर्जानुसार दखलपात्र, अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करावी किंवा अर्ज जर दिवाणी स्वरुपाचा असेल तर तक्रारदारास तसे लेखी कळवून अर्ज २४ तासांत निकाली काढणे ठाणेप्रमुखास बंधनकारक आहे. शिवाय ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


बक्षीस आणि दंडात्मक कारवाईही
पोलिसांचे कर्तव्य उत्कृष्टपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्षिसे दिली जातील. तक्रार अर्ज चौैकशीच्या नावाखाली प्रलंबित ठेवणाऱ्या, कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. गंभीर प्रकरणात निलंबन, मुख्यालयात बदलीसारखी कारवाई केली जाऊ शकते.

वाळू तस्करांवरील कारवाईकरिता महसूल विभागाला मदत
वाळू तस्करी करणाऱ्या लोकांवर कडक करण्यासाठी तहसीलदार, मंडळ अधिकारी अथवा तलाठी यांना जेव्हा-केव्हा पोलिसांची मदत हवी असेल तेव्हा ती देण्यात येईल. शिवाय क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करणारे, चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतील.

वेरूळ- अजिंठा लेणी येथे लवकरच टूरिस्ट पोलीस
जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा लेण्या पाहण्याकरिता देश-विदेशातील पर्यटक येतात. त्यांच्या सुरक्षेकरिता, शिवाय त्यांच्याशी इंग्रजीसह विविध भाषांत संवाद साधू शकतील अशा टूरिस्ट पोलिसांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे. या टूरिस्ट पोलिसांना महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. परिणामी पर्यटकांना कोणताही त्रास येथे होणार नाही, याबाबत हे पोलीस खबरदारी घेतील.


कन्नड ग्रामीण आणि फर्दापूर पोलीस ठाणे सुरू करणार
औरंगाबाद जिल्ह्यात शेंद्रा एमआयडीसी, वैजापूर ग्रामीण, लासूर आणि करंजखेडा, कन्नड ग्रामीण आणि फर्दापूर या सहा नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी कन्नड ग्रामीण आणि फर्दापूरचे प्रस्ताव मंजूर झाले असून ही ठाणी लवकरच सुरू केली जाणार आहेत. पोलीस ठाण्याच्या इमारत, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे बांधकाम सुरू करण्यात येत असल्याचे अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले.

क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सौहार्दपूर्ण वातावरण करणार
ग्रामीण पोलिस दलातून लवकरच कम्युनिटी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असून यात प्रत्येक गावातील सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होऊ शकतात. त्यामुळे विविध जाती-धर्मातील दरी कमी होऊन सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
महिलांवरील गुन्हे रोखण्याकरिता स्वतंत्र पथक
शाळा, महाविद्यालयात मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्याकरिता स्वतंत्र पथक स्थापन करण्यात येत आहे. हे पथक प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जाऊन मुले, मुलींशी संवाद साधेल आणि कायदेविषयक माहिती देईल. पथकाचे मोबाईल क्रमांक असणारी पत्रके वाटप केली जाणार आहेत.

दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणार
औरंगाबाद ग्रामीण विभागात दोषसिद्धीचे प्रमाण १८ टक्के आहे. हे प्रमाण वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक दाखल गुन्ह्यात आता सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून घेण्याचे आदेशित केले आहे. शिवाय दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचे अवलोकन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.


रेड्डी म्हणाले की, अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आपण येथे काम केलेले असल्याने या जिल्ह्याची पूर्ण माहिती आहे. येथे रुजू झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता येथे प्रामुख्याने शेतजमिनीच्या वादातून होणाऱ्या हाणामारीचे प्रकरण, किरकोळ कारणावरून मारहाण, अवैध वाळू तस्करी, अवैध दारूविक्री, अपघातांचे, गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Priority to community policing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.