यात्रेपूर्वी तिजोरीत ४९ लाख रु.जमा
By Admin | Updated: September 18, 2014 00:41 IST2014-09-18T00:18:17+5:302014-09-18T00:41:17+5:30
औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुऱ्यात भरविण्यात येणाऱ्या यात्रेच्या भाड्यापोटी छावणी परिषदेला ४८ लाख ९८ हजार रुपये प्राप्त झाले आहेत.

यात्रेपूर्वी तिजोरीत ४९ लाख रु.जमा
औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुऱ्यात भरविण्यात येणाऱ्या यात्रेच्या भाड्यापोटी छावणी परिषदेला ४८ लाख ९८ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे परिषदेला पहिल्यांदाच एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
मराठवाड्यातील खूप मोठी यात्रा म्हणून कर्णपुरा यात्रेची ख्याती पसरली आहे. कर्णपुऱ्यातील देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात दररोज लाखो भाविक येथे येत असतात. कर्णपुऱ्यातील सुमारे ६ एकर जागेवर ही यात्रा भरविण्यात येते. यासाठी दरवर्षी छावणी परिषद टेंडर काढीत असते. यात यात्रेच्या जागेचे भाडे व पार्किंगच्या भाड्याचा समावेश असतो. दोन्ही टेंडर एकाच दिवशी काढण्यात येतात. मागील वर्षी यात्रेच्या जागेचे टेंडर अवघ्या १७ लाख रुपयांत, तर पार्किंगच्या जागेचे टेंडर ३ लाख ९१ हजार रुपयांत गेले होते. यंदा यात्रेचे टेंडर ४४ लाख रुपयांमध्ये, तर पार्किंगचे टेंडर ४ लाख ९८ हजार रुपयांत देण्यात आले. पहिल्यांदाच यात्रेच्या टेंडरमधून छावणी परिषदेच्या तिजोरीत ४९ लाख रुपये जमा झाले. यासंदर्भात परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत लोटे यांनी सांगितले की, यंदा टेंडरमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. याचा फायदा छावणी परिषदेला झाला. परिषदेच्या वतीने यात्रेत पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. याशिवाय वीजपुरवठा करण्यात येणार आहे. पथदिवे लावण्यात येणार आहेत. भाविकांच्या सेवेत डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पथकही येथे नेमण्यात येणार आहे.