सावकाराच्या घरावर छापा
By Admin | Updated: January 25, 2017 00:47 IST2017-01-25T00:44:48+5:302017-01-25T00:47:45+5:30
जालना : तालुक्यातील वखरीवडगाव येथील सावकाराच्या घरावर सहकार खात्याने छापा मारून कारवाई केली.

सावकाराच्या घरावर छापा
जालना : तालुक्यातील वखरीवडगाव येथील एका सावकाराने ५० हजारांचे एक लाख रूपये घेवूनही तारण म्हणून ठेवलेला धनादेश व कागदपत्र परत दिले नाही. संबंधिताच्या तक्रारीवरून सावकाराच्या घरावर सहकार खात्याने मंगळवारी छापा मारून कारवाई केली. यामुळे सावकारी व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
जालना तालुक्यातील वखारी वडगाव (पात्रातांडा) येथील संजय बाबू पवार यांनी गावातीलच सावकार शंकर भुरा जाधव यांचेकडून ५० हजार रुपये २० टक्के शेकडा दराने घेतलेले होते. त्यासोबत एक कोरा चेक व एक कोरा बॉन्ड दिला होता. सदर व्यवहाराच्या अनुषंगाने ५० हजार मुद्दल व रुपये ५० हजार व्याज व एकदा ३० हजार रूपये २० टक्के दराने सावकारास एकूण १ लाख ३० हजार रूपये परत दिले.त्यानंतर कोरा धनादेश व कोरा बॉन्ड परत मागितला असता सावकाराने तो देण्यास नकार दिला. केस करण्याच्या धमक्या देवून पुन्हा ३५ हजार रूपये व्याजाचे राहिले असल्याचे सांगून ते देण्याची मागणी ेकेली. सावकार आपली पिळवणूक करीत आहे म्हणून जाधव यांनी याविरूद्ध सहकार खात्याकडे तक्रार करून सावकारावर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत सहाय्यक निबंधक जालना यांचेमार्फत चौकशीसाठी पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार चौकशी पथकाने मंगळवारी सकाळी साडेसात वाजता सावकार शंकर भुरा जाधव यांच्या राहत्या घरावर पोलीस बंदोबस्तात धाड टाकून झडती घेतली. ही कारवाई विभागीय सहनिबंधक राजेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक विष्णू रोडगे, चौकशी अधिकारी सुभाष राठोड, सहकार अधिकारी नारायण बेडवाल, संजय गाजुलवाड तसेच उपनिरीक्षक बोर्ईने, शेख, गिरी पोलीस शिपाई यांनी केली.(प्रतिनिधी)