चरबी बनविणाऱ्या कारखान्यावर छापा
By Admin | Updated: April 12, 2015 01:00 IST2015-04-12T01:00:07+5:302015-04-12T01:00:07+5:30
नळदुर्ग : जनावरांची हाडे, खुर्र व शिंगापासून चरबी बनविणाऱ्या कारखान्यावर नळदुर्ग पोलिसांनी छापा टाकून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़

चरबी बनविणाऱ्या कारखान्यावर छापा
नळदुर्ग : जनावरांची हाडे, खुर्र व शिंगापासून चरबी बनविणाऱ्या कारखान्यावर नळदुर्ग पोलिसांनी छापा टाकून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई शनिवारी दुपारी घट्टेवाडी (ता़तुळजापूर) शिवारात करण्यात आली असून, पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़
तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी शिवारात अनधिकृत, विनापरवाना मयत जनावरांची हाडे उकळून आजुबाजुच्या परिसरातील लोकांच्या जिवीतास, आरोग्यास संसर्ग पसरवून बेकायदेशीरपणे कारखाना चालविला जात होता. शनिवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी मोहन विधाते, सपोनि फुलचंद मेंगडे यांच्यासह सुमारे चाळीस पोलिसांच्या ताफ्याने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी ७६ हजार रुपये किंमतीची २०० लिटर्सचे ३८ बॅरल चरबी, २४ हजार रुपये किंमतीचे दोनशे लिटर क्षमतेचे ८० लोखंडी व प्लॅस्टिक रिकामे बॅरेल, ६५ हजार रुपये किंमतीच्या पाच लोखंडी कढया व चरबीची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत असलेला ट्रक (क्र. एमएच १३/ एएल ३००२) असा एकूण जवळपास साडेसहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी कारखान्याचे मालक रशिद माजीद कुरेशी (वय ३२), इस्माईल आदम कुरेशी (वय १८, दोघे रा. सोलापूर), खय्युम मो. शमीम शेख (वय ३२), माहीयोद्दीन बशारत हुसेन शेख (वय ४०), शहाजाँह जेहरूनहक शेख (वय ४०, तिघे रा. बिहार) यांना अटक करण्यात आली. उशिरापर्यंत ईटकळ दूरक्षेत्र येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)