डाळिंबाचे भाव गडगडले
By Admin | Updated: September 11, 2014 00:36 IST2014-09-11T00:26:16+5:302014-09-11T00:36:11+5:30
जालना : जिल्ह्यात डाळिंबाची वाढलेली आवक तसेच उत्पादन यामुळे डाळिंबास अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

डाळिंबाचे भाव गडगडले
जालना : जिल्ह्यात डाळिंबाची वाढलेली आवक तसेच उत्पादन यामुळे डाळिंबास अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला डाळिंब विक्री सुरु केली आहे.
जालना जिल्ह्यात गत काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत डाळिंब, मोसंबी, चिकू तसेच फुल शेती सारख्या नगदी पिकांना प्राधान्य देत आहेत. या शेतीतून शेतकरी आर्थिक उन्नतीही साधत आहे. मात्र अस्मानी अथवा सुलतानी कारभारामुळे हे शेती धोक्यात येत आहे. गत काही दिवसांपासून डाळिंब उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अक्षरश: वीस ते पंचवीस रुपये प्रतिकिलो भावाने डाळिंब विक्री करावी लागत आहे. काही शेतकरी डाळिंबाचे ढिगारे रस्त्यावर सोडून जात आहेत. एकूणच डाळिंब शेती चांगलीच अडचणीत आली आहे. जिल्ह्यात साधारणपणे २ हजार हेक्टरवर डाळिंब शेती केली जाते. उत्पादनही चांगले निघते. कृषी विभागाकडून डाळिंब शेतीला प्रोत्साहन तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
घनसावंगी तालुक्यातील राहेरा येथील प्रगतशील शेतकरी सरपंच पंडितराव धांडगे म्हणाले, जिल्ह्यात डाळिंबाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामुळे भाव अत्यल्प मिळत आहे. गत काही वर्षातील डाळिंब हे मोठे नुकसान आहे. शासनाने मदत करण्याची गरज आहे.
अंबड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी माजी सभापती सतीश होंडे म्हणाले, की शासनाने निर्यातबंदी केल्याने डाळिंबाचे भाव कमालीचे गडगडले आहेत. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावर बसून आपला माल विक्री करावा लागत आहे. भाव कमी झाल्यामुळे केलेला खर्चही भरुन निघालेला नाही.
जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे म्हणाले, डाळिंबाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे अचानक आवक वाढल्याने भाव वाढीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे बहराचे नुकसान झाले होते. नवा व जुना बहार एकदाच आल्याने उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. निर्यात बंदीचा फारसा फरक पडलेला नाही. ८० टक्के डाळिंब स्थानिक पातळीवरच विक्री होते.
जालना जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यावर डाळिंब उत्पादक विक्रीसाठी बसलेले दिसतात. काही शेतकरी तर डाळिंबाचे ढिगारे रस्त्यावर सोडून जात आहेत.