भूस्खलन रोखण्यासाठी करा वृक्षसंवर्धन

By Admin | Updated: August 2, 2014 01:10 IST2014-08-02T00:28:22+5:302014-08-02T01:10:37+5:30

अविनाश चमकुरे, नांदेड भूस्खलनाने पुणे जिल्ह्यातील माळीण येथे अपरिमीत जीवित हानी झाली़ हे संकट नैसर्गिक असले तरी यास मानवी हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे़

To prevent landslides, tree conservation | भूस्खलन रोखण्यासाठी करा वृक्षसंवर्धन

भूस्खलन रोखण्यासाठी करा वृक्षसंवर्धन

अविनाश चमकुरे, नांदेड
भूस्खलनाने पुणे जिल्ह्यातील माळीण येथे अपरिमीत जीवित हानी झाली़ हे संकट नैसर्गिक असले तरी यास मानवी हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे़ अशा स्वरुपाच्या घटना टाळण्यासाठी डोंगरावर वृक्षसंवर्धन करणे चांगला उपाय होवू शकतो, असे मत भूगर्भशास्त्राचे अभ्यासक तथा स्वारातीम विद्यापीठाचे बीसीयुडी डॉ़ दीपक पानसकर यांनी व्यक्त केले़
भूस्खलन झाल्याने माळीण हे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेले़ येथील डोंगर बेसाल्ट या खडकापासून निर्माण झाले आहेत़ मराठवाड्यात आढळून येणारे खडक याच प्रकारातील आहेत़ सह्याद्रीच्या डोंगररांगांची उंची जास्त असून पाऊसही अधिक पडतो़ त्यामुळे असे प्रकार जास्त प्रमाणात घडतात़ तुलनेने मराठवाड्यात या उंचीचे डोंगरही नाहीत़ शिवाय पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने येथे भूस्खलनाची भीती नाही़
पर्यावरण संतुलनात वृक्षांची भूमिका महत्त्वाची
झाडाची मुळे जमीन घट्ट रोवून ठेवण्याचे काम करतात़ त्यामुळे जमिनीला भेगा पडणे, भूस्खलन होणे असे प्रकार होत नव्हते़ शहरीकरणासाठी जागेची कमतरता भासत असल्याने निसर्गाच्या विरोधात जावून अनेक डोंगर पोखरुन काढले जात आहे़ मुरुमासाठीही मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे़ यामुळे नैसर्गिक समतोल बिघडला जात आहे़ बेसुमार वृक्षतोडीने मौल्यवान वनसंपदा नामशेष होत आहे़ परिणामी पावसाच्या अनियमिततेने अवर्षणाचा सामना करावा लागत आहे़
काय कराव्यात उपाययोजना
४डोंगरपायथ्याशी अनेक गावे वसली आहेत़ अशा डोंगरांची सातत्याने पाहणी करणे गरजेचे आहे़ विशेषत: पावसाळा सुरु होण्यापूर्वी ही खबरदारी घ्यावी़ डोंगरावर भेगा आढळल्यास व ही फट वाढत गेल्यास येथे पावसाचे पाणी मुरण्याची जास्त शक्यता असते़ पुढील धोका टळण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे़ सिमेंटींग, वायरनेट, ग्राऊटींग करुन डोंगर एकसंघ ठेवता येऊ शकतो़
पुणे जिल्ह्यातील माळीण येथे भूस्खलनाच्या घटनेत अख्खे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेले़ त्यामुळे डोंगरपायथ्याशी असलेल्या राज्यभरातील गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यासाठी आता राज्य शासनानेही उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे़, परंतु मानवी हस्तक्षेपामुळे होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे़

Web Title: To prevent landslides, tree conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.