अवैध कामे करणाऱ्यांना रोखा
By Admin | Updated: December 16, 2015 00:18 IST2015-12-16T00:05:07+5:302015-12-16T00:18:17+5:30
औरंगाबाद : बारकोड उत्तरपत्रिका खरेदी प्रकरणाची आता राज्यपालांमार्फत चौकशी जाहीर झाल्यानंतर आता विद्यापीठात अवैध कामे करणाऱ्यांना चाप बसायला हवा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

अवैध कामे करणाऱ्यांना रोखा
औरंगाबाद : बारकोड उत्तरपत्रिका खरेदी प्रकरणाची आता राज्यपालांमार्फत चौकशी जाहीर झाल्यानंतर आता विद्यापीठात अवैध कामे करणाऱ्यांना चाप बसायला हवा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत
आहेत.
सुमारे ७६ लाख रुपयांच्या बारकोड उत्तरपत्रिका खरेदी करताना निविदा पद्धतीचा वापर न करता खरेदी करण्यात आली. या प्रकरणी सिनेटच्या चौकशी समितीने दोषी ठरविल्यानंतरही कुलगुरू आणि अधिकार नसलेल्या सिनेटने नोव्हेंबर महिन्यात स्वत:ला या प्रकरणातून ‘क्लीन चिट’ मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा हा प्रयत्न विधान परिषदेतील या विषयावरील चर्चेने सफल झाला नाही.
उलट राज्यपालांमार्फत या प्रकरणाची पुन्हा चौकशी लागली. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे आणि तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य उल्हास उढाण म्हणाले की, बारकोड उत्तरपत्रिका खरेदीचा विषय खरेदी समितीसमोर न येता खरेदी
झाली.
त्यावेळीच या प्रकरणात काहीतरी गैरप्रकार झाला असल्याची शंका आली. म्हणून विद्यापीठाच्या सिनेटमध्ये या प्रकरणाची चौकशी समिती स्थापन करावी लागली. आता राज्यपाल कार्यालयामार्फत या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार असल्याने या प्रकरणातील सत्य समोर येईल. विधिमंडळाने दिलेले चौकशीचे आदेश म्हणजे एक प्रकारे ठपकाच असून, अशा प्रकरणात कुलगुरूसारख्या व्यक्तीने राजीनामाच दिला पाहिजे.
महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन (मुप्टा)चे डॉ. संभाजी वाघमारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नियम डावलून खरेदीची प्रक्रिया राबविणे म्हणजे गैरप्रकारच आहे. विद्यापीठाने शैक्षणिक आणि परीक्षा फीरूपाने जमा केलेल्या विद्यार्थ्यांच्या रकमेचा हा अपहारच म्हणावा लागेल. त्यामुळे या प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पाच लाख उत्तरपत्रिका शिल्लक असताना नव्या उत्तरपत्रिका का खरेदी करण्यात आल्या हे कोडेच आहे.