पदाधिकाऱ्यांचे दबावतंत्र
By Admin | Updated: August 14, 2014 02:09 IST2014-08-14T01:56:10+5:302014-08-14T02:09:18+5:30
नांदेड :बहुतांश कामे उरकण्याचे प्रयत्न जिल्हा परिषद पदाधिकारी करीत आहेत़ यातून अधिकारी - पदाधिकाऱ्यांत खटकेही उडण्यास प्रारंभ झाला आहे़

पदाधिकाऱ्यांचे दबावतंत्र
नांदेड : आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी उरला असताना जिल्हा परिषदेत बहुतांश कामे उरकण्याचे प्रयत्न जिल्हा परिषद पदाधिकारी करीत आहेत़ यातून अधिकारी - पदाधिकाऱ्यांत खटकेही उडण्यास प्रारंभ झाला आहे़ यातून अनेक अधिकाऱ्यांनी कार्यालयात न थांबता दौऱ्यांना पसंती दिली आहे़
जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात अध्यक्ष बेटमोगरेकर हे गुंतले आहेत़ जवळपास २ कोटी रूपये आणि १३ व्या वित्त आयोगातून ही १ कोटी ८० लाखांचे नियोजन करणे आवश्यक आहे़ हे नियोजन सर्वसाधारण सभेत करणे आवश्यक आहे़ मात्र असे न करता पदाधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने नियोजन केले जात आहे़ या नियोजनास अधिकाऱ्यांकडून संमती मिळावी अशी अपेक्षा पदाधिकारी बाळगत आहेत़ मात्र अधिकारी नियमावर बोट ठेवून असे करण्यास नकार देत असल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये खटके उडत आहेत़ बुधवारी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यात बुधवारी विसंवाद घडल्याचाही प्रकार पुढे आला आहे़
नियमबाह्यरित्या मंजुरीसाठी पुढे आलेल्या अनेक संचिकांना जिल्हा परिषदेत सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी ब्रेक लावला आहे़ ही बाब आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसाठी मोठी अडचणीची ठरत आहे़ जवळपास दीड महिन्यांपासून पदाधिकारी - अधिकारी आमने आले आहेत़ यातून पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना दमदाटीही केल्याची काही प्रकरणे पुढे आली आहेत़
दरम्यान, जिल्ह्यात राजीव गांधी पंचायतराज सक्षमीकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना नूतन इमारत बांधकामासाठी आलेला ३ कोटी १९ लाख ५० हजार रूपयांचा निधी वाटप करताना अनियमतता झाल्याची तक्रार जि़ प़ सदस्य मोहन पाटील टाकळीकर यांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली़ या तक्रारीनंतर गा्रमविकासमंत्र्यांनी निधी वाटपात अन्याय न करता समान न्याय देण्याची सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे़ ६४ ग्रा़ पं़ ना हा निधी वाटप करण्यात त्यात नांदेड व मुखेड तालुक्यात प्रत्येकी ९ ग्रा़ पं़ आहेत़ कंधार व लोहा तालुक्यातही प्रत्येकी ५ ग्रा़पं़ना निधी दिला़ (प्रतिनिधी)