निवडणुकीसाठी पीठासन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
By Admin | Updated: July 11, 2014 00:57 IST2014-07-11T00:16:03+5:302014-07-11T00:57:40+5:30
परभणी: जिल्ह्यातील सात नगरपालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक ११ जुुलै रोजी होत आहे.

निवडणुकीसाठी पीठासन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
परभणी: जिल्ह्यातील सात नगरपालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक ११ जुुलै रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सात अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू आणि सोनपेठ या सात नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पूर्णा, पाथरी, गंगाखेड, मानवत, सोनपेठ आणि सेलू या नगर पालिकेच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची मुदत २० जून रोजी तर जिंतूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची मुदत २७ जून रोजी संपली आहे. उर्वरित अडीच वर्षाच्या काळासाठी पुढील अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी सर्व पालिका सदस्यांची विशेष सभा बोलाविणे आवश्यक असून या सभेसाठी पीठासन अधिकारी नियुक्त करावयाचे आहेत. त्यानुसार गंगाखेड नगर पालिकेसाठी परभणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. जिंतुरसाठी उपजिल्हाधिकारी पूनर्वसन, मानवत नगरपालिकेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, पाथरीसाठी उपविभागीय अधिकारी पाथरी, पूर्णेसाठी उपविभागीय अधिकारी गंगाखेड, सेलूसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी परभणी तर सोनपेठ नगरपालिकेसाठी रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांची पीठासन अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ११ जुलै रोजी दुपारी १२ वाजता नगराध्यक्ष निवडीसाठी त्या त्या नगरपालिकेमध्ये विशेष सभा घेण्यात येऊन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.
अध्यक्षाच्या निवडीनंतर उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यात ११ जुलै रोजीच सकाळी १० ते १२ या वेळेत उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर या नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी कालावधी दिला जाणार असून त्यानंतर उपाध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
असे आहे आरक्षण
नगराध्यक्ष निवडीसाठी पुढील अडीच वर्षाचे आरक्षण जाहीर झाले असून त्यानुसार नगराध्यक्षांची निवड होणार आहे. गंगाखेड पालिकेचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागासप्रवर्गातील महिलेसाठी, जिंतूरचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागासप्रवर्गातील महिलेसाठी, मानवत खुल्या गटातील महिलेसाठी, पाथरी आणि पूर्णा येथील नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी, सेलू येथील नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी तर सोनपेठ नगर पालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.