‘साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे केवळ सत्काराचा धनी’
By Admin | Updated: September 2, 2014 01:55 IST2014-09-02T01:39:05+5:302014-09-02T01:55:17+5:30
विजय सरवदे , औरंगाबाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामध्ये मला रस नाही. त्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांनी माझी पुस्तके वाचल्याचा सर्वाधिक आनंद मला होईल

‘साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे केवळ सत्काराचा धनी’
विजय सरवदे , औरंगाबाद
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामध्ये मला रस नाही. त्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांनी माझी पुस्तके वाचल्याचा सर्वाधिक आनंद मला होईल व तेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. शेवटी अध्यक्षपद म्हणजे काय हो. वर्तमानपत्रात फोटो आणि सत्काराशिवाय त्या पदाची प्रतिष्ठा तरी कोणी राखली, अशी खंत प्रख्यात कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे यांनी खास ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित कार्यक्रमानिमित्त प्रा. पठारे हे सोमवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. तो असा-
प्रश्न : सर, मराठी साहित्यामध्ये प्रख्यात कादंबरीकार म्हणून आपली ओळख आहे; पण अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आजपर्यंत आपण दिसलेले नाहीत.
उत्तर : आज ज्या पद्धतीने व ज्या प्रकारे संमेलने होतात त्यामधून अर्थपूर्ण असं काही घडतंय असं दिसत नाही. मराठी साहित्य संमेलने म्हणजे नुसता उत्सव होतो. ज्याच्यासाठी हा उत्सव करायचा तो बाजूलाच पडलेला असतो. साहित्य संमेलने ही ग्रंथनिर्मिती आणि सांस्कृतिक आदानप्रदान यास महत्त्व प्रस्थापित करण्याचा उत्सव असतो; पण आजच्या संमेलनाचे स्वरूप बघता त्यात रस घ्यावा असं मला वाटत नाही.
प्रश्न : संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुका तर चुरशीच्या होतात.
उत्तर : साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे असते तरी काय. वर्तमानपत्रात फोटो आणि काही काळ सत्कार होतात. अशा आनंददायी सोहळ्याचा उपयोग नाही. अध्यक्ष होण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांनी माझी पुस्तके वाचावीत, हे माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे. अध्यक्षपदामध्ये ज्यांना रस आहे, त्यांनी तो आवडीने मिळवावा. मला मात्र, त्यात अजिबात रस नाही.
प्रश्न : विश्व साहित्य संमेलनाकडे तुम्ही कसे बघता.
उत्तर : ते फारच चमत्कारिक वाटते. मराठी विश्व साहित्य संमेलन विदेशात कुठे तरी भरविणे म्हणजे तेथे आपल्या लोकांना कमी पैशात पर्यटन घडवून आणणे, असे दिसते. ‘मराठी’साठी महाराष्ट्रात खूप काही करता येते. त्यासाठी विदेशात जावे असे मला वाटत नाही. या राज्यात मराठी भाषेसाठी खूप वाव आणि जागा आहे. पण, जे करतात त्यांच्याविषयी आकस नाही. मराठी भाषा व संस्कृतीच्या दृष्टीने अशा साहित्य संमेलनातून प्राप्ती काय होते, याचे संयोजकांनी आत्मपरीक्षण करावे, असे मला वाटते.
प्रश्न : मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे आपण अध्यक्ष होता. शासनाकडे अहवाल सादर झालाच असेल.
उत्तर : सहा महिन्यांपूर्वीच आमच्या समितीने अकादमिक अंगाने बहुतांशी परिपूर्ण व जोरकस असा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. अहवाल सादर करताना मराठीतील अनेक मान्यवर, भाषातज्ज्ञ आणि व्यासंगी विद्वान यांचे मार्गदर्शन घेतले. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्यास मराठी भाषकांचा सामूहिक आत्मविश्वास वाढेल. याशिवाय भाषेच्या विकासासाठी, तिच्यातील अनमोल ठेव्याच्या जतनासाठी निधी उपलब्ध होईल, ही एक अनुषंगिक गोष्ट आहे.
प्रा. रंगनाथ पठारे म्हणाले की, ‘चोषक फलोद्यान’ ही माझी नवी कादंबरी लवकरच येतेय. या कादंबरीतील ‘गर्भित’ लेखक मृत्यूच्या उंबरठ्यावर ‘कोमात’ गेलेला आहे. तेथून आपले संपूर्ण जीवन, आपले लेखन, आपली आसक्ती, आपला भ्रम याचा तो शोध घेतोय. पुन्हा पुन्हा तो आपलं जगणं रचण्याचा प्रयत्न करतोय, त्याची ही गोष्ट आहे.