अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 00:29 IST2016-11-19T00:31:29+5:302016-11-19T00:29:31+5:30
लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण न्यायालयाच्या सूचनेनुसार बदलण्यात आले

अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले
लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण न्यायालयाच्या सूचनेनुसार बदलण्यात आले असून, सर्वसाधारण महिलांसाठी सुटलेले आरक्षण आता सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे. या नव्या पद्धतीनुसार लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहे.
यापूर्वी झालेल्या आरक्षण सोडतीत लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी सुटले होते. त्यामुळे विद्यमान अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या तयारीला लागल्या होत्या. मात्र मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने नव्याने आरक्षण सोडतीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे सर्वसाधारण पुरुष आणि महिला अशी सोडत झाली आहे. या नव्या सोडतीत लातूरच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी सुटल्याचे वृत्त आहे. या निर्णयामुळे लातुरातील राजकीय घराण्यांमध्ये अचानक उत्साह संचारला आहे. अनेकजण अध्यक्ष पदाचे दावेदार तातडीने निवडणुकीच्या रिंगणात येण्यासाठी तयारीला लागले आहेत.
सर्वसाधारण गटाला अध्यक्षपद सुटल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरताच अनेकजणांनी खात्री करून घेण्यासाठी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला. मात्र या दोन्ही कार्यालयांतून या नव्या सोडतीला अधिकृतरीत्या दुजोरा मिळाला नाही. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद सुटले असल्याचे वृत्त आहे.(प्रतिनिधी)