जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
By Admin | Updated: May 29, 2014 00:29 IST2014-05-29T00:19:19+5:302014-05-29T00:29:30+5:30
लोकमत चमू , उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने वादळी वार्यासह हजेरी लावली़

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
लोकमत चमू , उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने वादळी वार्यासह हजेरी लावली़ तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा, केमवाडी, गवळेवाडी परिसरात गारांचा पाऊस झाला़ तसेच वीज पडून रेड्याचा मृत्यू झाला. अनेकांच्या घरावरील पत्रेही उडून गेले आहेत. वादळी वार्यामुळे दस्तापूर, जळकोट, नळदुर्ग, अलियाबाद, अंधोरा, अचलेर आदी परिसरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले़ या पावसात संसारोपयोगी साहित्य भिजल्यानेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ अपसिंगा, कामठा येथे गारपीट उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा, कामठा परिसरात बुधवारी दुपारी गारांचा पाऊस झाला़ १० मिनिटे गारा पडल्याने परिसरात पाणी-पाणी झाले होते़ तर गोठ्यांच्या शेडवरील पत्रेही उडून गेले होते़ तुळजापूर तालुका व परिसरात बुधवारी पावसाने हजेरी लावली़ दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अपसिंगा परिसरात दहा मिनिटे गारांचा पाऊस झाला़ वादळी वार्यामुळे घरांसह शेतातील शेडची पत्रे उडून गेले़ येथील अरूण गोरे यांच्या शेतात उभारण्यात आलेले शेड भुईसपाट झाले असून, अनेक पत्रे उडून गेली आहेत़ कामठा गाव व परिसरातही गारांचा पाऊस पडला़ या गारपीट व पावसामुळे खरिपाच्या मशागतीच्या कामांवरही परिणाम झाला़ तसेच फळबागा, पानमळ्यांसह, भाजीपाला, पिकांचेही नुकसान झाल्याचे शेतकरी राहुल गोरे, सचिन जाधव, कामठा येथील शाहीर रोकडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी) केमवाडीत डोक्यात दगड पडून तिघे जखमी तामलवाडी : बुधवारी दुपारी ३.३० वाजता झालेल्या वादळी वारे व गाराच्या अवकाळी पावसाचा तडाखा तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी, केमवाडी, गवळेवाडी या गावाला बसला असून, माळुंब्रा येथे वीज पडून म्हशीच्या हाल्याचा जागीच मृत्यू झाला. तर केमवाडीत घरावरील पत्रे उडून गेल्याने डोक्यात दगड पडून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन गावातील सुमारे शंभर घरावरील पत्रे वार्याने उडून गेले आहेत. जळकोटवाडी शिवारात लिंबोणीच्या बागा मुळासकट उपटून भुईसपाट झाल्या आहेत. वादळी वार्याने महावितरणचे ५० विजेचे खांब व एक ट्रान्सफार्मर जमिनीवर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. दुपारी ३ वाजता अचानक विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसास प्रारंभ झाला. यातच वादळी वार्याने थैमान घातले. केमवाडी येथे वार्याने घरावरील पत्रे उडून गेल्याने डोक्यात दगड पडून पूजा रामचंद्र नकाते (वय २५), राजाबाई नकाते (वय ६०), आण्णा राजेंद्र नकाते (वय १२) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच गावातील ५० घरावरील पत्रे वार्याने उडाले असून, विजेचे २५ खांब भुईसपाट झाले आहेत. विजेच्या तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून, वार्याने भाजीपाला, ऊस, केळी, पपई, द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. माळुंब्रा शिवारात प्रताप आतकरे यांच्या शेतात बांधलेल्या म्हशीच्या रेड्यावर वीज पडली व त्यात रेड्याचा मृत्यू झाला. जळकोटवाडी येथे ५० घरावरील पत्रे उडाले असून, वार्याचे २५ विद्युत खांब व एक ट्रान्सफार्मर जमिनीवर कोसळला. आबाराव वसुदेव फंड यांच्यासह अन्य शेतकर्यांच्या लिंबोणीच्या बागा मुळासकट उपटून फळबागांचे नुकसान झाले. पाऊस आल्याने घरात बसलेल्या छतावरील पत्रे लाकडी खांबासह कोसळले व पत्र्याखाली अडकलेल्या वनिता काशीद, भारत काशीद, बाळासाहेब काशीद, संदीपान काशीद या चौघांना वाचविण्यात गावकर्यांना यश आले आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जळकोटवाडीचे सरपंच राजाभाऊ फंड व केमवाडीचे धनंजय काशीद यांनी केली आहे. सांगवी, सुरतगाव, सावरगाव, काटी, माळुंब्रा या भागात दमदार पाऊस झाला. (वार्ताहर) दस्तापुरात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले येणेगूर : वादळी वारे, जोरदार पावसाच्या तडाख्यात दस्तापूर (ता़उमरगा) येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले़ पावसात संसारोपयोगी साहित्य भिजल्याने अनेकांचे नुकसान झाले असून, रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती़ बुधवारी दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी त्रेधातिरपीट उडाली़ दस्तापूर व परिसरात दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली़ वादळी वार्यात दस्तापूर गावानजीकच्या जगन पाटील यांच्या घरासमोरील बाभळीचे मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडले़ त्यामुळे वाहतूक सुमारे अडीच तास ठप्प झाली़ तर महामार्गावर दोन्ही बाजूंनी पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या़ माहिती मिळताच मुरूम पोलिस ठाण्याचे सपोनि एस़पी़शिरसाठ, नळदुर्ग महामार्गाचे पोउपनि जे़ एम़ तांबोळी, येणेगूर दूरक्षेत्राचे पोहेका गोरोबा कदम, बिभिषण देडे आदीनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली़ सायंकाळी सहा वाजता झाडे तोडून मार्ग दोन्ही बाजूंनी खुला केला़ राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अभियंता राजेश हिरंगे यांना माहती मिळातल्यानंतर मजूर पाठवून झाडे तोडली़ दस्तापूर येथील नवनाथ पाटील, धोंडीराम माडजे, लक्ष्मण मदने, सचिन चव्हाण, एकनाथ पाटील, ज्ञानेश्वर वाकळे, आदी नागरिकांनी मदतकार्य केले़ दरम्यान, या वादळात जळकोट भागानजीकच्या महामार्गावरील तीन झाडे पडल्यामुळे तेथेही वाहतूक विस्कळीत झाली होती़ नळदुर्ग महामार्गचे पोलिस उपनिरीक्षक जे़एम़तांबोळी, पोहेकॉ आऱपी़राठोड, आय़ एल़ सय्यद, ज्ञानेश्वर कांबळे, गर्जे आदींनी ट्रॅक्टरच्या मदतीने झाडे बाजूला केली. (वार्ताहर) यांच्या घरावरील पत्रे उडाले नवनाथ पाटील, धोंडीराम माडजे, लक्ष्मण चव्हाण, एकनाथ पाटील, धोंडीबा माडजे, श्रीरंग शिंगटे, प्रभाकर पाटील, सोपान चव्हाण, जगन्नाथ पाटील, कमाबाई कलशेट्टी, राजेंद्र काडप्पा दयानंद चव्हाण.