अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्र्यांनी घेतला कार्यकर्त्यांचा दरबार
By Admin | Updated: July 10, 2014 00:46 IST2014-07-10T00:01:15+5:302014-07-10T00:46:56+5:30
हिंगोली : जिल्ह्यात घोषित न झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पुर्व तयारीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यमंत्री फौजिया खान यांनी कार्यकर्त्यांचा दरबार घेतला.

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्र्यांनी घेतला कार्यकर्त्यांचा दरबार
हिंगोली : जिल्ह्यात घोषित न झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पुर्व तयारीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यमंत्री फौजिया खान यांनी बुधवारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा दरबार घेतला. यावेळी कार्यकर्त्यांची कोणती कामे प्रलंबित आहेत, याचीच शहानिशा अधिकाऱ्यांसमक्ष करण्यात आली.
राज्याच्या आरोग्य, सामान्य प्रशासन, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण, अल्पसंख्यांक विकास, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री फौजिया खान बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने राज्यमंत्री खान या जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानुसार सकाळी औंढा येथे अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता चौधरी, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी पवार, कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यंबडवार, हिंगोलीचे गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड, सेनगावचे पंकज राठोड आदींसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, रायुकाँचे अनिल पतंगे, आप्पासाहेब देशमुख, गडदे आदींची उपस्थिती होती.
उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध गाऱ्हाणे मंत्र्यांसमोर मांडले. याचा जाब तत्काळ उपस्थित अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली तर काही प्रश्नांवर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे ही बैठक आढावा बैैठक होती की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीचा दरबार होता? असा प्रश्न उपस्थित झाला. या बैैठकीनंतर पत्रकारांशी चर्चा करताना राज्यमंत्री फौजिया खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा संपर्कमंत्री असल्याने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या तयारीची आढावा बैठक जिल्ह्यातील विविध ठिकाणी घेण्यात येत असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांच्या तक्रारींची निरसन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य विभागाची विविध रिक्त पदे भरण्यासंदर्भात त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. राज्यात सर्वत्रच रिक्त पदे आहेत, त्यातील काही सरळ सेवा भरतीने तर काही पदोन्नतीने भरण्यात येणार असल्याचे सांगितले. हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह दीड महिना का बंद होते? असा सवाल त्यांना केला असता याची आपणास माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणी चौकशी किंवा कारवाई करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची भूमिका त्यांनी घेतली नाही.
हिंगोलीनंतर कळमनुरीत बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री फौजिया खान यांनी तालुक्यातील पाणीटंचाई व दुष्काळपूर्व परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, डी. बी. काळे, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, गटविकास अधिकारी कल्पना क्षीरसागर, विरकुंवर, प्रकाश जोंधळे, एस. टी. खंदारे, विठ्ठल भुसारे, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, वैद्यकीय अधिक्षक कुलकर्णी, राकाँचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
निश्चित निर्णय नाही
राज्यमंत्री फौजिया खान यांनी औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी व वसमत येथे घेतली दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणून फौजिया खान यांनी घेतली बैठक.