परतुरातील उड्डाणपुलाचा आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:53 IST2017-07-23T00:51:41+5:302017-07-23T00:53:47+5:30
परतूर : शहरात परतूर-आष्टी रोडवर होणाऱ्या उड्डाणपुलाचा आराखडा तयार झाला आहे.

परतुरातील उड्डाणपुलाचा आराखडा तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शहरात परतूर-आष्टी रोडवर होणाऱ्या उड्डाणपुलाचा आराखडा तयार झाला आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार शहरात येणारा रस्ता अंडरग्राऊंड राहणार आहे. त्यामुळे रेल्वे गेटवरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
परतूर आष्टी रस्त्यावरील रेल्वे गेटवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या गेटवर रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले. गत चार वर्षांपासून या पुलाच्या कामाचा गोंधळ सुरू आहे. पुलासाठी सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये शहराकडून आष्टीकडे व रेल्वे स्टेशनकडून आष्टीकडे जाणारे दोन्ही मार्ग उड्डाण पुलाद्वारे जोडण्यात येणार होते. मात्र, शहराकडून आष्टीकडे जाणारा मार्ग उड्डाण पुलावरून घेतल्यास मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ विस्कळीत होईल. त्यामुळे काही व्यापारी मंडळींनी पडद्याआड हालचाली करत उड्डाण पुलाचे डिझाईन बदलले. यातील एक मार्ग भुयारी करून घेतला. दरम्यान, या गोंधळात सदर पुलाचे काम रखडले. रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनीही याकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही. परिणामी, पुलाचे काम लांबले. येथील खडकाच्या दोनदा तपासण्या झाल्या. परंतु पुढे हालचाली झाल्या नाहीत.
आता या पुलाचा आराखडा तयार झाला असून, त्यास प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामास कधी सुरुवात होते, याकडे परतूर वासियांचे लक्ष लागले आहे.
उड्डाण पुलाच्या आराखड्यास मंजुरी मिळाली असून, अंदाजपत्रकाचे काम सुरू आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामास सुरुवात केली जाईल.
एल.डी. देवकर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.