गोरोबाकाकांच्या यात्रेची जय्यत तयारी
By Admin | Updated: April 16, 2017 23:20 IST2017-04-16T23:12:54+5:302017-04-16T23:20:23+5:30
तेर : येथील श्रीसंत गोरोबाकाका यांच्या वार्षिक यात्रोत्सवास २२ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.

गोरोबाकाकांच्या यात्रेची जय्यत तयारी
तेर : येथील श्रीसंत गोरोबाकाका यांच्या वार्षिक यात्रोत्सवास २२ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार असून, भाविकांना सेवा पुरविण्यासाठी प्रशासनाकडूनही जय्यत तयारी सुरू आहे.
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक तेरनगरीत संतश्रेष्ठ गोरोबाकाकांचे वास्तव्य आहे. २२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यात्रोत्सवामध्ये टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत राज्याच्या विविध भागातून हजारो वारकरी सहभागी होणार आहेत. यानिमित्त विविध ठिकाणाहून जवळपास ६० दिंड्या तेरनगरीत दाखल होत असल्याने टाळ-मृदंगाच्या गजराने हा परिसर दणाणून जातो. एकादशी दिवशी या दिंड्यांची नगरप्रदक्षिणा होणार असून, याच दिवशी येथील जुन्या बसस्टँडजवळ ग्रामस्थांच्या वतीने दिंड्यांमधील सहभागी वारकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यात्रा नियोजनासाठी मंदिर ट्रस्टसह आरोग्य, महसूल, परिवहन आदी विभागांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. महसूल प्रशासनाच्या वतीने यात्रा नियोजनाबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार सुजित नरहरे, सपोनि किशोर मानभाव, ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघ, दीपक नाईकवाडी, मंगेश फंड, फातिमा मणियार, श्रीमंत फंड, नंदाताई पुनगडे, व्ही. बी. चाटे, डॉ. सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान, यात्राउत्सवानिमित्त सध्या मंदिराला रंगरंगोटीसह इतरही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. भाविकांच्या सावलीसाठी मंदिरासमोर मोठा मंडप उभारण्यात येणार असून, दर्शन रांगेत उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, कुलरचीही सोय केली जाणार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी दहा टँकरची मागणी करण्यात आली आहे.