जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी वेगात
By Admin | Updated: August 27, 2014 23:39 IST2014-08-27T23:30:03+5:302014-08-27T23:39:01+5:30
हिंगोली : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पांच्या आगमनाची तयारी पंधरवड्यापासून जोरात सुरू आहे.

जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी वेगात
हिंगोली : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पांच्या आगमनाची तयारी पंधरवड्यापासून जोरात सुरू आहे. हिंगोली शहरात जवळपास लहानमोठ्या मंडळांनी मखरापासून सजावटीपर्यंतची उभारणी केली. गुरूवारपर्यंत शहरातील ३५ मंडळांनी परवाना घेतला आहे.
महाराष्ट्राचे लाडके दैवत गणरायाचा भक्तगण मोठा आहे. शहरच नव्हे तर वस्तीतांड्यावरही अगदी थाटामाटात मूर्तीची स्थापना केली जाते. शहरात या उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त होते. हे पाहता पावसाळ्याच्या प्रारंभापासून गणेश मूर्तीची उभारणी कारागीरांकडून सुरू आहे. हिंगोलीत मोजके पाच ते सहा मूर्तीकार मागील तीन महिन्यांपासून मेहनत घेत होते. नुकताच त्यांनी मूर्तीवर शेवटचा हात फिरवला. आता सर्वत्र बाजारात लहान-मोठ्या मूर्ती आल्या आहेत. साधारण ५०० रूपयांपासून २० हजार रूपयांच्या मूर्ती पाहवयास मिळतात. यंदा भाव वधारले तरी विराट मूर्ती घेण्याकडे प्रत्येक मंडळाचा कल असतो. अशा मूर्ती घेणाऱ्या मंडळांची संख्या जवळपास ३० असून एकूण ८० ते ९० मंडळांकडून मूर्तीची स्थापना केली जाते.
बुधवारपर्यंत ३५ मंडळांनी शहर ठाण्यात नोंदणी केली होती. पदाधिकाऱ्यांकडून भक्तांसाठी व्यवस्था, विद्युत रोषणाई टाकणे, मखर उभारणी, देखावे तयार करणे, सजावट, शिखर उभारणीसाठी दोन आठवड्यापासून मेहनत घेत आहेत. सामाजिक उपक्रमांची आखणी काही मंडळांनी केली आहे. मंडळांकडून बेटी बचाओ, गोमाता रक्षण, झाडे लावा झाडे जगवा आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
एक गाव, एक गणपती
जिल्ह्यात गतवर्षी ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना सव्वा तीनशे गावांत झाली होती. अद्याप एकही नोंदणी पोलिसात झालेली नाही. गावात वितुष्ट वाढणार नाही म्हणून पोलिसांकडून तंटामुक्त गाव समित्यांना यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार तंटामुक्ती समित्यांकडून कामही सुरू असून त्याला किती प्रतिसाद मिळतो, ते येत्या दोन दिवसांत समजणार आहे.