प्रीपेड मीटरच्या निर्णयाला बे्रक
By Admin | Updated: November 2, 2016 00:50 IST2016-11-02T00:47:33+5:302016-11-02T00:50:20+5:30
औरंगाबाद : महावितरण कंपनीने शहरातील वीजचोरी रोखण्यासाठी प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचा निर्णय घेतला होता;

प्रीपेड मीटरच्या निर्णयाला बे्रक
औरंगाबाद : महावितरण कंपनीने शहरातील वीजचोरी रोखण्यासाठी प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु मीटरची किंमत आणि त्यामध्येही वीजचोरी वाढण्याची शक्यता लक्षात येताच महावितरणने प्रीपेड मीटर बसविण्याचा निर्णय गुंडाळला आहे. अनेकदा जुने विद्युत मीटर बदलण्याची व नवीन विद्युत मीटर बसविण्याची मोहीम कंपनीने राबविली; परंतु वीज ग्राहकांनी वीजचोरीसाठी वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवून महावितरणच्या संशोधन आणि विकास विभागाला आव्हान दिले.
प्रीपेड विद्युत मीटरची किंमत ४ हजार ५०० रुपयांच्या आसपास होती. ते मीटर बदलणे आणि ग्राहकांकडून ती रक्कम वसूल करण्याबाबत अनेक अडचणी होत्या. तसेच वीजचोरी थांबेल, असा कुठलाही आशावाद कंपनीला नव्हता. त्यामुळे प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याच्या मोहिमेला ब्रेक लागला.
कंपनीने सुरुवातीला आयआर या प्रकारातील विद्युत मीटर बसविले. हे मीटर रिमोटने हँग होत असे. त्यानंतर टँपर प्रूफ मीटर मागविले; परंतु त्या मीटरचे सील तोडण्याचे प्रकार वाढीस लागले. ग्राहकांच्या विरोधात अनेक दंडात्मक कारवाया केल्या; परंतु त्यातूनही कंपनीच्या हाती काहीही लागले नाही. सद्य:स्थितीत नवीन विद्युत मीटर बसविण्याची मोहीम वैजापूर पथदर्शी तत्त्वावर राबविण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे.
महावितरण कंपनीने जुने चकतीचे मीटर बदलले, त्यानंतर जीटीएलने महावितरण कंपनीने बसविलेले मीटर बदलले. आता पुन्हा महावितरण कंपनी जीटीएलने बदललेले परंतु फॉल्टी असलेले मीटर बदलत आहे. चकतीचे व षटकोनी आकाराचे जुने मीटर अनेक ठिकाणी असून त्याकडे कंपनीचे स्थानिक अभियंते व कर्मचारी क्षुल्लक लोभापायी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.