प्रसूतिवेदनांनी व्याकूळ महिलेची अवहेलना
By Admin | Updated: November 6, 2016 00:57 IST2016-11-06T00:37:08+5:302016-11-06T00:57:59+5:30
वैजापूर : प्रसूतीसाठी आलेल्या एका गरोदर आदिवासी महिलेला डॉक्टरांच्या प्रतीक्षेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायऱ्यांवर तब्बल तीन तास बसावे लागले.

प्रसूतिवेदनांनी व्याकूळ महिलेची अवहेलना
वैजापूर : प्रसूतीसाठी आलेल्या एका गरोदर आदिवासी महिलेला डॉक्टरांच्या प्रतीक्षेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायऱ्यांवर तब्बल तीन तास बसावे लागले. हा निंदनीय व संतापजनक प्रकार तालुक्यातील बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी घडला. तीन तास बसूनही डॉक्टर तर आलेच नाहीत; बंद असलेला दवाखानाही उघडला
नाही. शेवटी वेदनेने असह्य झालेल्या या महिलेला ग्रामस्थांनी रुग्णवाहिका करून पुढील उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
वैजापूर तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील मौजे बोरसर येथील सुनीता दादासाहेब सोनवणे या गर्भवती महिलेला नातेवाईकांनी बोरसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी दुपारी १ वाजता दाखल केले. मात्र या केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल व शेख दोन्हीही गैरहजर होते. शिवाय केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांनीही दुपारी १२ वाजताच केंद्राला कुलूप लावले होते.
त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या या महिलेला तब्बल तीन तास पायऱ्यावरच बसावे लागले. आरोग्य केंद्र उघडण्याची व डॉक्टर येण्याची प्रतीक्षा करता करता वेदनेने व्याकुळ झालेल्या या महिलेला बघून ग्रामस्थ जमा झाले.
यावेळी काही ग्रामस्थांनी केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र सर्वांचे मोबाईल नॉट रिचेबल येत असल्याने अखेर १०८ या नंबरवर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. साडेपाच वाजता रुग्णवाहिका आल्यानंतर त्या आदिवासी गरोदर महिलेला पुढील उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.