२० हजारात गर्भलिंग निदान !
By Admin | Updated: January 6, 2017 00:13 IST2017-01-06T00:13:11+5:302017-01-06T00:13:56+5:30
बीड अनेकांनी गर्भलिंगनिदान करण्यासाठी शेजारच्या राज्यातील शहरांचा ‘मार्ग’ निवडल्याचे समोर आले आहे.

२० हजारात गर्भलिंग निदान !
संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव
बीड
स्त्री- भू्रण हत्येच्या घटनांनी मलीन झालेली बीडची प्रतिमा आणखी काहीशी उंचावत नाही तोच आता अनेकांनी गर्भलिंगनिदान करण्यासाठी शेजारच्या राज्यातील शहरांचा ‘मार्ग’ निवडल्याचे समोर आले आहे. २० हजार रुपये फेकले की गर्भलिंगनिदान व ४० हजार रुपये टाकले की गर्भपात करुन देणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. कोडवर्ड म्हणून मुलीसाठी ‘राधा’ व मुलाकरता ‘कृष्ण’ अशा नावांचा आधार घेतला जात आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने ग्राहक बनून एका दलालाशी संवाद साधला तेव्हा त्याच्याकडून या गोरखधंद्याच्या ‘कर्नाटक-कनेक्शन’चा पर्दाफाश झाला.
जिल्ह्यातील खाजगी सोनोग्राफी सेंटरवर प्रशासनाने धाडी टाकून गर्भलिंग निदान चाचणीचे प्रकार बंद करण्याच्या दृष्टीने पावले टाकली. परिणामी मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील स्त्रीजन्म दर प्रतिहजारी ७९७ वरून ९२४ पर्यंत उंचावला. मात्र, एक मुलगी, दोन-तीन मुली असलेल्या कुटुंबात वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, ही धारणा कायम आहे. त्यामुळे गर्भलिंग निदानासाठी अशी कुटुंबे गर्भवती मातांना आता महाराष्ट्राशेजारील कर्नाटकाचा रस्ता दाखवीत आहेत. याचा फायदा घेत काही दलाल आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे उघडकीस आणले आहे.