भविष्यासाठी पायाभूत सुविधांना प्राधान्य
By Admin | Updated: October 9, 2014 00:49 IST2014-10-09T00:41:42+5:302014-10-09T00:49:56+5:30
औरंगाबाद : औरंगाबादची विविध क्षेत्रांतील प्रगती पाहता शहर झपाट्याने वाढत आहे.

भविष्यासाठी पायाभूत सुविधांना प्राधान्य
औरंगाबाद : औरंगाबादची विविध क्षेत्रांतील प्रगती पाहता शहर झपाट्याने वाढत आहे. भविष्यातील या महानगराच्या विस्तारात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी योजनाबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून औरंगाबादला अत्याधुनिक महानगर बनविण्याचे आश्वासन आ. राजेंद्र दर्डा यांनी दिले.
राजेंद्र दर्डा यांनी नेहमीच शहराच्या सर्वांगीण विकासाचे कार्य केले आहे. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन त्यांनी आपल्या ‘व्हिजन औरंगाबाद’ या जाहीरनाम्यात शहरातील पायाभूत सुविधांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. राजेंद्र दर्डा यांनी योजनाबद्ध आराखडा तयार केला आहे. त्यानुसार रस्ते, वीज, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, रेल्वेमार्ग, पाणी, पासपोर्ट कार्यालय, पार्किंग झोन इत्यादीसह अनेक महत्त्वाच्या मुद्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली.
औरंगाबाद शहराने विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. अनेक संधी उपलब्ध झाल्याने औरंगाबादची झपाट्याने वाढ होत आहे. वाढती लोकसंख्या आणि विस्तार यामुळे अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यामध्ये रिंग रोडअभावी अनेक वाहने शहरात घुसतात. परिणामी, जालना रोड किंवा इतर मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यातच सार्वजनिक वाहतूक नियमित नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वेमार्गांची कमतरता, पाणीटंचाई, विजेचे भारनियमन आदींसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी शहरात आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
राजेंद्र दर्डा यांनी विविध भागांत पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांमुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. सध्या शहरात आणखी तीन उड्डाणपुलांचे काम सुरू असून शहरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागाची इमारत, विभागीय क्रीडा संकुल, सिडको नाट्यगृह, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशी त्यांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांची अनेक उदाहरणे देता येतील. समांतर जलवाहिनीसाठी केंद्राचा निधी उपलब्ध करून देऊन त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
राजेंद्र दर्डा यांच्या आराखड्यात सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेच्या बळकटीकरणापासून ते पासपोर्ट कार्यालयापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश आहे. शहर बस वाहतुकीच्या ताफ्यात १०० नवीन बस दाखल करून देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. औरंगाबाद रेल्वेस्टेशन आधुनिकीकरणाच्या कामानंतर आता मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनही सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कुठल्याही शहराच्या विकासात रेल्वेमार्गांचा विकास अत्यंत महत्त्वाचा असतो. औरंगाबाद- चाळीसगाव रेल्वेमार्गाच्या निर्मितीतून मराठवाडा- खान्देशला जोडण्याचे काम हाती घेणार आहे. यासोबतच पाणी, वीज, वाहतूक यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे व्हिजन औरंगाबादमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.