अंदाज समितीच्या ‘अंदाजा’ची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 23:39 IST2017-07-05T23:37:50+5:302017-07-05T23:39:31+5:30
हिंगोली : जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या अंदाज समितीचा ‘अंदाज’ कसा असेल यावरून अधिकाऱ्यांत धास्ती दिसून येत आहे

अंदाज समितीच्या ‘अंदाजा’ची धास्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या अंदाज समितीचा ‘अंदाज’ कसा असेल यावरून अधिकाऱ्यांत धास्ती दिसून येत आहे. परभणीवरून त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्नही अनेकजण करताना दिसत होते. मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सगळीकडे अलर्ट राहत आहे.
अंदाज समितीने त्यांना माहिती व आढावा अपेक्षित असलेल्या बाबींची आधीच विविध विभागांसाठी प्रश्नावली प्रशासनाकडे दिली आहे. त्यानुसार त्यांचा आढावाही घेतला जाणार आहे. त्याची माहिती एकत्र करण्यासह इतर बाबींसाठी प्रशासनाकडून मागील काळात बैठका घेण्यात आल्या. त्यानंतरही आज काही विभागांच्या कामाची तयारी सुरू असल्याचे दिसून येत होते.
काही विभागांचे मात्र प्रभारी अधिकारी असल्याने त्यांना या दौऱ्याची चांगलीच धास्ती लागली आहे. याशिवाय काही अधिकारी आज परभणीच्या वारीवरही गेले आहेत. अंदाज समितीतील किती सदस्यांची हजेरी आहे. त्यांची परभणीत काय व कशी व्यवस्था केली, तसेच नेमकी समितीची कार्यपद्धती कशी राहील, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्याचा कितपत फायदा होईल, हे आताच सांगणे अवघड आहे.