मुस्लिम बांधवांची पावसासाठी साश्रू नयनाने प्रार्थना
By Admin | Updated: July 7, 2014 00:20 IST2014-07-07T00:09:25+5:302014-07-07T00:20:54+5:30
नांदेड: पावसाने पाठ फिरविल्याने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले आहे़ पाऊस पडण्यासाठी सर्वत्र ईश्वराची आराधना करण्यात येत आहे़
मुस्लिम बांधवांची पावसासाठी साश्रू नयनाने प्रार्थना
नांदेड: पावसाने पाठ फिरविल्याने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले आहे़ पाऊस पडण्यासाठी सर्वत्र ईश्वराची आराधना करण्यात येत आहे़ या पार्श्वभूमीवर रविवारी देगलूरनाका परिसरातील मुस्लिम बांधवांनी साश्रू नयनाने पाऊस पडण्यासाठी नमाज अदा करून ईश्वराला साकडे घातले़
मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत़ त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे़ पावसाची प्रतीक्षा करण्यात दीड महिना उलटला़ मात्र अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ दुष्काळ तोंडावर आहे, त्यामुळे माणसे ईश्वराची धावा करत आहेत़
देगलूरनाका भागातील ईदगाव मैदानावर रविवारी सकाळी दहा वाजता सहा हजार मुस्लिम बांधवांनी एकत्र येवून ईश्वराजवळ आपल्या गुन्ह्यांची कबुली देत व माफी मागत पाऊस पाडण्याची विनंती केली़ यावेळी लहान मुले व प्राण्यांनाही सोबत घेतले होते़ यासंदर्भात माहिती देत मौलाना सरवर म्हणाले, पृथ्वीवर जेव्हा पाप वाढते, तेव्हा अशी परिस्थिती उदभवते़ त्यासाठी ईश्वराजवळ आपल्या गुन्ह्यांची कबुली व माफी मागणे आवश्यक असते़ यावेळी निष्पाप मुले तसेच मुक्या प्राण्यांना सोबत घेण्यात येते़
या प्रार्थनेत, हे ईश्वरा तुझ्यापुढे आम्ही खुप दुबळे असून तुच आमचा पाठीराखा आहेस़ आम्ही आमच्या गुन्ह्यांची कबुली देत असून तु आम्हाला माफ कऱ निदान आमच्या लहान मुले तसेच मुक्या प्राण्यांवर तुझी कृपादृष्टी कऱ पाऊस पडत नसल्यामुळे आम्ही सर्व निराश झालो आहेत़ आता तरी पाऊस पाड, अशी याचना करण्यात येते़ सफा बैतूलमान या सामाजिक संघटनेच्या वतीने या प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते़ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रमजान या पवित्र महिन्यात संघटनेच्या वतीने गोरगरीबांना राशन, कपडे देण्यात आल्याचेही मौलाना सरवर यांनी सांगितले़ नमाज अदा करताना मौलाना अलीमोद्दीन, महंमद सरवर खासमी यांनी माहिती दिली़ (प्रतिनिधी)