पं.स. पदाधिकारी निवड आज होणार

By Admin | Updated: September 13, 2014 23:04 IST2014-09-13T23:02:03+5:302014-09-13T23:04:36+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यांच्या सभापतीची निवड उद्या, १४ रोजी होणार आहे.

Pps The selection of the office will be held today | पं.स. पदाधिकारी निवड आज होणार

पं.स. पदाधिकारी निवड आज होणार

हिंगोली : जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यांच्या सभापतीची निवड उद्या, १४ रोजी होणार आहे. आज दिवसभर विविध राजकीय नेत्यांकडे लॉबिंगसाठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. प्रत्येक पक्ष आपल्याकडे पंचायत समिती राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत होते.
औंढा नागनाथ येथे शिवसेना ९, कॉंग्रेस ५, राकॉं ३, भाजपा १ असे पक्षीय बलाबल आहे. मागच्यावेळी भाजपा आघाडीच्या बाजूने गेली अन् ईश्वरीचिठ्ठीनेही सेनेला दगा दिला. त्यामुळे यावेळी भाजपाला गळ घालून स्पष्ट जुळवाजुळव केली जात आहे. हा सदस्य सेनेला मिळाल्यास राजेंद्र सांगळे वा अनिल देशमुख यांच्यापैकी एकाच्या गळ्यात सभापती तर एकाच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडणार आहे.
हिंगोलीतही राकॉं, कॉंग्रेस व बसपाचे समीकरण जुळण्याची शक्यता आहे. सदस्य सहलीवर गेल्याने हे समीकरण निश्चितच मानले जात आहे. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीला सभापतीपदाची संधी मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. तर उपसभापतीपद कॉंग्रेसला मिळेल, असे सांगितले जात आहे. बसपाची भूमिका यात निर्णायक ठरणार आहे. पक्षीय बलाबल कॉंग्रेस-५, राकॉं-३, शिवसेना-४, भाजप-३ व बसपा-१ असे आहे. लताबाई जाधव व सीताबाई राठोड या राकॉंतर्फे इच्छुक आहेत.
पंचायत समिती सभापती निवडीत काही ठिकाणी आगामी विधानसभेची गणिते मांडली जात आहेत. पक्षाला या पदाधिकाऱ्यांचा फायदा व्हावा, या हेतूने पदाधिकारी निवडीवर भर दिला जाणार असल्याचे संकेत सगळीकडे मिळत आहेत. काही ठिकाणी आरक्षणामुळे गणिते बिघडलेली आहेत. तरीही पहिल्या टप्प्यात जी चुरस दिसून येत होती, ती यावेळी दिसत नाही.
१० ते १२ वेळेदरम्यान नामनिर्देशनपत्र देण्याचा व स्वीकारण्याचा कालावधी असून दुपारी १२ ते २ दरम्यान मागे घेण्याची मुदत आहे. दुपारी २ नंतर सभापती, उपसभापतींची निवड होणार आहे. वेळ पडल्यास हात वर करून मतदान होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
ऐनवेळी नामनिश्चिती
वसमत: वसमत पं.स.मध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत आहे. २४ पैकी १६ सदस्य असल्याने विधानसभेच्या दृष्टीने लाभदायक ठरतील, अशाच सदस्यांना सभापती व उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.संपर्कप्रमुख आनंद जाधव हे वसमतला येणार आहेत.सर्वसाधारण महिलेसाठी पद असून राऊबाई बेले, रोहिणी देशमुख इच्छुक आहेत. सदस्य सहलीवर गेले असून डॉ.जयप्रकाश मुंदडा हेच सभापती ठरवतील, असे चित्र आहे.
सेनगाव : येथील पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी भारी चुरस आहे. अगोदर कॉंग्रेसने मनसे व अपक्षांसोबत फिल्डिंग लावली होती. मात्र ते जमत नसल्याने आता राष्ट्रवादी व युतीची सोबत होऊन सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. अपक्षांचीही त्यात साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार सभापतीपदी विराजमान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरीही निवडीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pps The selection of the office will be held today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.