पं.स. इमारतीचे महिन्यात दोनदा झाले लोकार्पण !
By Admin | Updated: August 31, 2014 01:08 IST2014-08-31T00:43:53+5:302014-08-31T01:08:41+5:30
प्रकाश मिरगे , जाफराबाद तालुक्यात विकास कामांचे श्रेय घेण्याचे राजकारण सुरु असून जाफराबाद पंचायत समिती कार्यालय नवीन इमारतीचे एक महिन्याच्या अंतरावर दोनदा लोकार्पण कार्यक्रम झाल्याने

पं.स. इमारतीचे महिन्यात दोनदा झाले लोकार्पण !
प्रकाश मिरगे , जाफराबाद
तालुक्यात विकास कामांचे श्रेय घेण्याचे राजकारण सुरु असून जाफराबाद पंचायत समिती कार्यालय नवीन इमारतीचे एक महिन्याच्या अंतरावर दोनदा लोकार्पण कार्यक्रम झाल्याने सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. दोन कोटी रुपये खर्च करुन भव्य इमारत उभी दिसत असल्याचे पाहून श्रेय घेण्याकरीता प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
लोकार्पण सोहळा ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री राजेश टोपे, आ. चंद्रकांत दानवे प्रमुख अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार होता. मात्र जयंत पाटील न आल्याने पालकमंत्री यांच्या हस्ते ३० आॅगस्ट रोजी कार्यक्रम घेण्यात आला. याच नवीन इमारतीतचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे, जि. प. अध्यक्ष आशाताई भुतेकर, उपाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी घेण्यात आला.
पंचायत समिती कार्यालयाचे भूमिपूजन कार्यक्रम देखील अशाच प्रकारचा रंगला होता. पंचायत समितीमध्ये भाजप-सेना युतीची सत्ता आहे. त्यामुळे त्यांना आपल्या सोयीनुसार हा कार्यक्रम घेऊन आमचा अधिकार असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यात आमची सत्ता आहे, म्हणून प्रशासकीय नियमानुसार तो आमचा अधिकार आहे, असे सांगून खरा प्रशासकीय लोकार्पण सोहळा झाला, अशी चर्चा देखील कार्यकर्त्यांमध्ये होती.
आ. चंद्रकांत दानवे यांच्या विकास निधीमधून नवीन डांबरीकरण रस्ता चिखली रोड ते रेपाळा, सिद्धार्थ महाविद्यालय रस्त्याचे लोकार्पण जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु कार्यक्रम प्रसंगी राकॉँचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश चव्हाण यांचे नाव नामफलकावर कोठेच दिसून आले नाही.
मतदार संघात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष यांची आघाडी असताना कॉँग्रेसला या कार्यक्रमात कोठेच स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही कॉँग्रेसमध्ये मोठी दरी निर्माण होऊन अधिक संघर्ष वाढणार असल्याचे चिन्हे दिसू लागले आहे.जाफराबाद तालुक्यात लोकप्रतिनिधी यांच्याकडून झालेल्या कामाचे श्रेय कसे घ्यायचे यासाठी स्पर्धा सुरु आहे. तर दुसरीकडे तालुक्याला जोडल्या जाणाऱ्या व शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रमुख राज्य महामार्ग रस्त्याची दयनीय अवस्था आहे. शहरात बांधकाम विभागाचा काही ठिकाणी रस्ताच शिल्लक नाही. चिखली जाणारा महामार्ग डांबरीकरण रस्ता संपूर्ण खड्ड्यांनी व्यापून गेला अहे. याकडे कोणी लक्ष देत नाही. अशा रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होऊन अनेक कार्यक्रम घ्यावे, अशी चर्चा सुध्दा आता यानिमित्ताने होऊ लागली आहे. या प्रकाराने तालुक्यातील जनतेचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे.
पंचायत समितीची इमारत दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. मात्र त्याचे श्रेय घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत इमारत लोकार्पणाचे दोन वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. त्यास शासकीय अधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुका जवळ आल्याने मतदारसंघातील विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरूर् झाली आहे. त्यासाठी दावे-प्रतिदावेही केले जात आहेत. यामुळे मात्र तालुक्यातील जनतेचे चांगलेच मनोरंजन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.