औरंगाबाद : वीज पुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी २४ तास काम करणारे वीज कर्मचारी, अभियंत्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्यासह विविध मागण्यांसाठी वीज कंपन्यांतील ६ संघटनांच्या संयुक्त कृती समितीतर्फे २४ मेपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खा. इम्तियाज जलिल यांची भेट घेऊन वीज कामगारांचे प्रश्न मांडून निवेदन दिले.
निवेदनातील विषयांवर चर्चा करून मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना पत्र देऊन वीज कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खा. जलील यांनी दिले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस तथा संयुक्त कृती समितीचे समन्वयक सय्यद जहिरोद्दीन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी राज्य कोषाध्यक्ष कैलास गौरकर, प्रादेशिक सचिव श्रावण कोळनूरकर, प्रसिद्धी प्रमुख अजिज पठाण, एस. ई. ए. चे अविनाश चव्हाण, राजेंद्र राठोड, प्रशांत बनसोडे, वसिम पठाण, वर्कर्स फेडरेशनचे बी. एल. वानखेडे, पी. व्ही. पठाडे, कामगार संघाचे अरूण पिवळ, तुषार भोसले, बापू शिंदे, इंटकचे अख्तर अली आदींची उपस्थिती होती.