वीज उपकेंद्रे होणार-पालकमंत्री
By Admin | Updated: July 6, 2014 00:23 IST2014-07-06T00:11:36+5:302014-07-06T00:23:23+5:30
अंबड: जिल्ह्यात अशा दोन ठिकाणी १३२ के.व्ही.ए.ची दोन तर अंबड व घनसावंगी तालुक्यात विविध ठिकाणी ३३ के.व्ही.ए.च्या चार उपकेंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.

वीज उपकेंद्रे होणार-पालकमंत्री
अंबड: जिल्ह्यात जालना तालुक्यातील डांबरी व घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी अशा दोन ठिकाणी १३२ के.व्ही.ए.ची दोन तर अंबड व घनसावंगी तालुक्यात विविध ठिकाणी ३३ के.व्ही.ए.च्या चार उपकेंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. १०० के.व्ही.ए.च्या अंबड तालुक्यासाठी २१०, घनसावंगी तालुक्यासाठी २००, मंठा तालुक्यासाठी १६४, परतुर तालुक्यासाठी २०४ असे एकूण ७७८ ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी अंबड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना पालकमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात मोठे वीजसंकट निर्माण झालेले आहे. वीजटंचाई निवारणार्थ राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात राबविण्यात येणाऱ्या इन्फ्रा २ योजनेअंतर्गत जिल्ह्यात जालना तालुक्यातील डांबरी व घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी अशा दोन ठिकाणी १३२ के.व्ही. तर अंबड तालुक्यातील चंदनापुरी, घनसावंगी तालुक्यातील बोररांजणी, बानेगांव, भुतेगाव अशा चार ठिकाणी ३३ के.व्ही.ची चार सबस्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. ३३ के.व्ही.ए.ची एच.टी.लाईन १३० किलोमीटर, ११ के.व्ही.ए.ची लाईन ६०० किलोमीटर, शेतकऱ्यांसाठीची एल.टी.लाईन १२०० किलोमीटर अशी मोठ्या प्रमाणावर विजेची उभारणी करण्यात येणार आहे. २०१२ पर्यंतच्या वीजपंपांसाठीे अंबड तालुक्याला २४० तर घनसावंगी तालुक्याला ३०० वीज कनेक्शन मंजूर करण्यात आल्याची माहितीही यावेळी टोपे यांनी दिली. राजीव गांधी जीवनदायी योजनेपासून वंचित असणाऱ्या नागरिकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यादृष्टीने पुनर्सर्वेक्षण करुन केशरी व पिवळया रेशन कार्डचे वाटप करण्यात येणार आहेत. संभाव्य दुष्काळ लक्षात घेऊन तालुकास्तरीय वैरण विकास कार्यक्रमांना चालना देण्यात येणार आहे, टंचाईच्या दृष्टीने १ कोटी ३८ लाख रुपयांचा नवीन पुरवणी आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून याव्दारे नवीन विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे, खोलीकरण करणे, विहीर अधिग्रहरण करुन टँकर सुरु करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीत कामे नसल्याने रोजगार हमी योजनेच्या कामांना गती देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती यावेळी पालकमंत्री टोपे यांनी दिली. (वार्ताहर)