मुस्लिमांची भीती दाखवून मिळविली सत्ता!
By Admin | Updated: May 9, 2016 00:05 IST2016-05-09T00:02:25+5:302016-05-09T00:05:03+5:30
औरंगाबाद : गुजरातमध्ये दंगली, बोगस एन्काऊंटर, मंदिरांवर खोटे हल्ले घडवून आणले. हिंदू बांधवांमध्ये मुस्लिम दहशतवादाच्या नावाने भीती घालण्यात आली.

मुस्लिमांची भीती दाखवून मिळविली सत्ता!
औरंगाबाद : गुजरातमध्ये दंगली, बोगस एन्काऊंटर, मंदिरांवर खोटे हल्ले घडवून आणले. हिंदू बांधवांमध्ये मुस्लिम दहशतवादाच्या नावाने भीती घालण्यात आली. एका राज्यात हा पॅटर्न यशस्वी झाल्यावर ‘सबका साथ सबका विकास’म्हणत देशाची सत्ता मिळविली. वस्तुस्थिती आता हळूहळू सर्वांना कळू लागली आहे. देशातील न्यायव्यवस्था अजून जिवंत आहे. ही न्याय व्यवस्थाच निर्दोष नागरिकांना मोठ-मोठ्या गुन्ह्यांतून मुक्त करण्याचे काम करीत आहे, असे मत अहमदाबाद येथील मुफ्ती अब्दुल कय्युम यांनी आज येथे व्यक्त केले.
मुस्लिम नुमार्इंदा कौन्सिलतर्फे रविवारी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे ‘मुस्लिम जागृती’या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी मोहसीन उस्मानी नदवी, नुरूल हुदा, अब्दुल हमीद अजहरी, कौन्सिलचे अध्यक्ष अवेज अहेमद, मुज्तबा फारूक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल खवी फलाही उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुफ्ती अब्दुल कय्युम यांनी सांगितले की, अक्षरधाम मंदिरावर हल्ला केल्याच्या आरोपावरून मला गुजरात सरकारने तब्बल ११ वर्षे कारागृहात डांबले. सत्र न्यायालयाने पोलिसांच्या साक्षी पुराव्यावरून मला फाशीची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयात गुजरात पोलिसांनी निर्दोष व्यक्तीला कशा पद्धतीने खोट्या गुन्ह्यात अडकवले हे उघड झाले. गोध्रा हत्याकांडात ४२ निरपराध व्यक्तींनाही अशाच पद्धतीने गोवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. न्यायव्यवस्था त्यांनाही न्याय देईल. मालेगाव बॉम्बस्फोट, बेस्ट बेकरी स्फोट आदी अनेक गुन्ह्यांचे निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून आले आहेत. या प्रकरणातील आरोपींना क्लीन चिट देण्यात आली आहे. बाबरी मशीद शहीद झाल्यापासून आजपर्यंत दहशतवादाच्या नावावर मुस्लिमांचा छळ सुरू आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल खवी फलाही यांनीही शेवटी मार्गदर्शन केले. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.