औरंगाबाद : मध्य प्रदेश, पंजाबमधून नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. गुजरातमध्ये शीतगृहात बटाट्याचा बंफर साठा करून ठेवण्यात आला आहे. भाव गडगडत असल्याने शीतगृहातील बटाटा मातीमोल भावात विकला जाऊ लागला आहे. औरंगाबादेत रविवारी ठोक विक्रीत अवघ्या २ ते ३ रुपये प्रतिकिलोने गुजराती बटाटा विकल्या गेला. तर इंदोरच्या बटाटा ६ रुपये किलोने विकल्या जात होता. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बटाट्याचे ठोक व्यापारी मुजीबशेठ जम्मुशेठ यांनी सांगितले की, गुजरातमध्ये शीतगृहात बटाट्याचा जुना साठा मोठ्या प्रमाणात आहे. तिथे फुकटमध्ये बटाटा दिला जात आहे. हमाली व गाडीभाडे भरूनही औरंगाबादेत या बटाट्याला २०० ते ३०० रुपये क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळाला नाही. गुजरातचा बटाटा आतून पिवळसर व खाण्यास गोडसर असतो. जास्त दिवस टिकत नाही. तर इंदोरहून येणारा बटाटा ६०० रुपये क्विंटल विकत आहे.हा बटाटा आतून पांढ-या रंगाचा असून चवीला फिकट असतो. यामुळे इंदोरच्या बटाट्याला मागणी आहे. जाधववाडीत दररोज १० ट्रकपेक्षा अधिक बटाट्याची आवक होत आहे. नवीन बटाटा साठविण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशातील शीतगृह जुना बटाटा लवकर विकून मोकळे होत आहेत. परिणामी, बटाटा मातीमोल भावात विकल्या जाऊ लागला आहे.
औरंगाबादमध्ये गुजरातचा बटाटा विकला जातोय मातीमोल किंमतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 17:59 IST