पोटापाण्याचीचिंता मिटली
By Admin | Updated: March 30, 2015 00:44 IST2015-03-30T00:25:38+5:302015-03-30T00:44:01+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड हजार-बारशे लोकवस्तीचे गाव, ना जगण्याचे कुठले साधन.. ना पिण्यासाठी पाणी.. हत्तीच्या मस्तकासारखी काळीभोर जमीन असूनही पाण्याअभावी नशीबी कपाळकरंटेपणाच.

पोटापाण्याचीचिंता मिटली
व्यंकटेश वैष्णव , बीड
हजार-बारशे लोकवस्तीचे गाव, ना जगण्याचे कुठले साधन.. ना पिण्यासाठी पाणी.. हत्तीच्या मस्तकासारखी काळीभोर जमीन असूनही पाण्याअभावी नशीबी कपाळकरंटेपणाच. अशा असाह्य गावाच्या मदतीला तीन सामाजिक संस्था ऐन दुष्काळात धावून आल्या. रोज दोन वेळेचे जेवण व पाण्याचे टँकर गावाला दिल्याने पाटोदा तालुक्यातील येवलवाडी (सडकेची) येथील दुष्काळग्रस्तांची पोटापाण्याची चिंता मिटली आहे.
पाटोदा तालुका हा कायम दुष्काळी असल्याने येथील गावेच्या गावे ओस पडली आहेत. मजुरांच्या हाताला काम नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. पाटोद्यापासून पश्चिमेला पंधरा किलो मीटर अंतरावर असलेल्या येवलेवाडी येथील लोकसंख्या हजार ते बाराशेच्या घरात आहे. ६०० ते ७०० ग्रामस्थांनी हाताला काम नाही म्हणून पोट भरण्यासाठी स्थलांतर केलेले आहे. उर्वरीत ग्रामस्थांच्या जेवनाची देखील पंचाईत आहे. अशा स्थितीत सामाजिक उत्तरदायित्वाचे भान असलेल्या सस्थांनी पुढाकार घेत येवलेवाडी हे गाव तीन महिन्यासाठी दत्तक घेतले.
दोन वेळेचे जेवण, पाणी दिले मोफत
केज येथील जनविकास सामाजिक संस्थेचे प्रमुख रमेश भिसे यांनी पुढाकार घेत २४ मार्च पासून येवलेवाडी येथील दोनशे ग्रामस्थांना दोनवेळेचे जेवण व पाणी मोफत दिले जात आहे. जनविकास सामाजिक संस्थेच्या मतदतीला मुंबई येथील ‘केअरींग इन फेन्डंस’ संस्थेचे निमेश भाई सुमित व यवतमाळ येथील दिलासाचे मधुकर धस हे धावून आले आहेत.
शासन मदतीची केली नाही अपेक्षा
शासन आम्हाला काय मदत करेल यापेक्षा आम्ही दुष्काळग्रस्तांसाठी काय मदत करू शकतो ? हे अधिक महत्त्वाचे आहे. येवलवाडी येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी नाही. ६० टक्के ग्रामस्थांचे कामाच्या शोधात स्थलांतर झाले आहे.
ग्रामस्थांची स्थिती लक्षात घेता आम्ही पुढील तीन महिने मोफत जेवण व पाणी देणार आहोत. पाण्यासाठी एका टँकरची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जनविकास सामाजिक संस्थेचे प्रमुख रमेश भिसे यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीची पहाणी करण्यासाठी सर्वच पक्षाचे केंद्रातील व राज्यातील नेत्यांनी बीड जिल्ह्याचे दौरे केल्याचे आढळून आले आहे.
४महामार्गालगतच्या एखाद्या शेताला व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट द्यायची व बीड शहरात येऊन पत्रकार परिषद घ्यायची यापलीकडे नेत्यांचे दुष्काळ दौरे गेलेले नाहीत.
४नेत्यांचे दुष्काळ दौरे केवळ आश्वासनांनीच गाजले असल्याचे चित्र आजवर तरी जिल्ह्यात पहावयास मिळाले आहेत.
सामाजिक उत्तरदायित्व म्हणून येवलवाडी येथील दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आम्ही शासन मदतीची अपेक्षा न करीता धावून गेलो आहोत. सध्या वरणभात, शिरा हे प्रकार ग्रामस्थांना देतोत. पुढील आठवड्यापासून पोळीभाजीचे जेवण देणार आहोत.
- रमेश भिसे
जनविकास सामाजिक संस्था