रोषामुळे निवड स्थगित

By Admin | Updated: January 15, 2016 00:18 IST2016-01-14T23:44:51+5:302016-01-15T00:18:29+5:30

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षाची निवड गुरुवारी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली.

Postpone selection due to light | रोषामुळे निवड स्थगित

रोषामुळे निवड स्थगित

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षाची निवड गुरुवारी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. एका नावावर शिक्कामोर्तब झाल्याची कुणकुण लागताच शहरातील काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी दुपारीच त्याविरोधात जालन्याला प्रदेशाध्यक्षांकडे धाव घेतली. तिथे तीन तास खलबते झाल्यावरही शहराध्यक्षांच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. दुसरीकडे शहरात निवडीच्या ठिकाणी दुपारनंतर सर्वच गटांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली. या पार्श्वभूमीवर सायंकाळी उशिरा निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलल्याचे जाहीर करण्यात आले.
नियोजित कार्यक्रमानुसार आज भाजपच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांची निवड होणार होती. शहराध्यक्षपदासाठी माजी आमदार किशनचंद तनवाणी, संजय केणेकर, दिलीप थोरात, संजय जोशी, अनिल मकरिये यांच्यासह इतरही काही जणांनी इच्छा दर्शविलेली आहे. हे पद मिळविण्यासाठी सर्वांकडूनच जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षांकडून एक नाव निश्चित झाल्याची कुणकुण सकाळीच शहरातील पदाधिकाऱ्यांना लागली. जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षात नव्याने आलेल्या व्यक्तीची निवड झाल्याची चर्चा सुरू झाली. त्याविरोधात शहरातील काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी तातडीने जालन्याकडे धाव घेतली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांनी संबंधित नावाला विरोध दर्शविला.
शहराध्यक्षपद पक्षातल्याच माणसाला द्या, बाहेरून आलेल्यांना नको, असा आग्रह या सर्वांनी धरल्याचे समजते. या गोंधळामुळे पक्षाने शहराध्यक्ष निवडीसाठी नियुक्त केलेले निरीक्षक आ. सुभाष देशमुख हेही जालन्यातच थांबले. इकडे ठरल्यानुसार दुपारी ३.३० वाजता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी कलश मंगल कार्यालयात जमले; परंतु सहा वाजले तरी निवडणूक निरीक्षक सुभाष देशमुख तेथे पोहोचले नाहीत. अस्वस्थतेनंतर शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कलश मंगल कार्यालयात येऊन निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलल्याची घोषणा केली.
जिल्हाध्यक्ष निवडही बारगळली
शहराध्यक्षांप्रमाणेच भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांचीही निवड गुरुवारी होणार होती. त्यासाठी पदाधिकाऱ्यांना दुपारी ३.३० वाजता विभागीय कार्यालयात बोलावण्यात आले होते. येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली; परंतु निवडणूक निरीक्षक खा. अमर साबळे शहरात येऊ शकले नाहीत.
म्हणून जिल्हाध्यक्षांची निवड उद्या करण्यात येईल, असा निरोप ४ वाजताच संबंधितांना देण्यात आला. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी आ. प्रशांब बंब, प्रदीप पाटील, संजय खंबायते, एकनाथ जाधव, सुरेश बनकर आदींची नावे चर्चेत आहेत.
निवड दोन दिवसांनी
पक्षात जुनेविरुद्ध बाहेरून आलेले असा वाद निर्माण झाला आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्याचा विचार करून आजची निवड स्थगित करण्यात आली. आता ही निवड दोन दिवसांनी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Postpone selection due to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.