शवविच्छेदन कक्षाचेच ‘पोस्टमार्टम’ करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:23+5:302020-12-17T04:30:23+5:30
रामेश्वर लोखंडे लासूर स्टेशन : मरणानंतरही मृतदेहाच्या यातना काहीकेल्या संपत नसल्याचे समोर आले आहे. हे वाचून सर्वांनाच प्रश्न पडला ...

शवविच्छेदन कक्षाचेच ‘पोस्टमार्टम’ करण्याची गरज
रामेश्वर लोखंडे
लासूर स्टेशन : मरणानंतरही मृतदेहाच्या यातना काहीकेल्या संपत नसल्याचे समोर आले आहे. हे वाचून सर्वांनाच प्रश्न पडला असेल की, हे कसे शक्य आहे. मात्र, हे अगदी सत्य आहे. लासूर स्टेशन येथील दायगाव रस्त्यावर असलेल्या शवविच्छेदनगृहाची झालेली दुरवस्था त्यास कारणीभूत ठरत आहे. महामार्गालगत घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे शवविच्छेदन येथे केले जाते. मात्र, येथील असुविधांमुळे या कक्षाचेच ‘पोस्टमार्टम’ करण्याची गरज निर्माण झाली आहे.
येथील असुविधांमुळे डॉक्टर, कर्मचारी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात सहा वाजेनंतर महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह या ठिकाणी आणला गेला. तर त्या मृतदेहाच्या नशिबी मृत्यूनंतरही यातना कायमच राहतात. झाडाझुड़पांच्या विळख्यात अडकलेल्या पाणी, विजेचा अभाव. तसेच मोडकळीस आलेला कक्ष, ना दरवाजा, ना सुरक्षारक्षक अशा परिस्थितीत येथे ठेवलेला मृतदेह रामभरोसेच असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे या शवविच्छेदनगृहाचे पोस्टमार्टम करून येथे सोईसुविधा द्याव्यात, जेणेकरून मृतदेहाची हेळसांड होणार नाही आणि डॉक्टर व कर्मचारी यांना शवविच्छेदनप्रक्रिया करण्यास सोयीचे होईल.
------
अधिकाऱ्यांनी केला कानाडोळा
लासूर स्टेशनलगत असलेल्या महामार्गावर आणि या परिसरातील अन्य ठिकाणी झालेल्या दुर्घटनेतील मृतांचे विच्छेदन दायगाव रोडवरील असलेल्या शवविच्छेदनगृहात केले जाते. रात्रीच्या वेळी काही दुर्घटना झाली तर मृतदेह रामभरोसेच ठेवावा लागतो. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गावकऱ्यांनी तक्रार केली आहे. तरीदेखील त्याकडे कानाडोळा केला जात आहे.
--------
अत्याधुनिक साहित्याचा अभाव, नातेवाईकांना हकनाक त्रास
शवविच्छेदन करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे कोणतेही साहित्य येथे उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे सायंकाळी सहा वाजेनंतर अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीचे शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी केले जाते. त्यामुळे मृताचे नातेवाईकच त्या मृतदेहाचे रक्षण कक्षाबाहेर उभे राहून करतात. त्या नातेवाईकांना त्या ठिकाणी पिण्यास पाणीही मिळत नाही, तर विजेच्या अभावाने रात्र अंधारातच काढावी लागते. आसपास स्वच्छता नसल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाही वाढलेला आहे. त्यामुळे या शवविच्छेदनगृहाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी अमोल शिरसाठ, संपत छाजेड यांनी केली आहे. विशेष म्हणजे, बांधकामाची मंजुरीदेखील देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा त्रास सहन करावा लागत आहे.
फोटो -