निजामकालीन राजवटीनंतर पहिल्यांदाच ‘पोस्टमन’ भरती
By Admin | Updated: February 6, 2015 00:56 IST2015-02-06T00:49:19+5:302015-02-06T00:56:47+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर पुर्वीच्या काळात कुठल्याही शासकीय नोकरीचे पत्र असो किंवा नातेवाईकाचे पत्र असो यासाठी पोस्टमनची वाट पहावी लागायची.

निजामकालीन राजवटीनंतर पहिल्यांदाच ‘पोस्टमन’ भरती
बाळासाहेब जाधव , लातूर
पुर्वीच्या काळात कुठल्याही शासकीय नोकरीचे पत्र असो किंवा नातेवाईकाचे पत्र असो यासाठी पोस्टमनची वाट पहावी लागायची. आता इंटरनेट व संगणकाच्या युगातही पोस्टमनचे महत्व कमी नाही. पण निजामकालीन राजवटीनंतर पहिल्यांदाच विभागस्तरावर पोस्टात पोस्टमनची भरती करण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यात पोस्टमनची संख्या ५० आहे़ त्यातही ११ पोस्टमन कायमस्वरुपी तर उर्वरित मात्र तात्पुरत्या स्वरुपात भरलेले ३५० ग्रामीण डाकसेवक पोस्टसेवकाचे काम करतात़ या पोस्टमनला टपाल वाटप, रजिस्ट्री, पार्सल, मनीआॅर्डरपासून, स्पीडपोस्ट, वृत्तपत्राचे पार्सल पोहोचविण्याचे काम करावे लागते़ तरीही निजामकाळापासून भरतीच झाली नसल्याने आहे, त्या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर लातूर पोस्टाचा कारभार सांभाळावा लागत आहे़ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कामकाजाचा कालावधी असूनही जास्तीची गावे दिल्यामुळे पोस्टमनला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे़
लातूरसह महाराष्ट्रातील इतर जिल्हे व गोवा राज्यातही पोस्टमनच्या अनेक जागा रिक्त असल्यामुळे संबंधीत कार्यालयाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला़ तरीही अद्यापपर्यंत पोस्टमनची भरती करण्यात आलेली नव्हती़ त्यामुळे असिस्टंट पोस्टमास्तर जनरल, आॅफिस आॅफ चिफ पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबईच्या वतीने पहिल्यांदाच राज्यभरात पोस्टमनची भरती सुरु केली आहे़ बऱ्याच कालखंडानंतर पोस्टात भरती प्रक्रिया होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही कौतुक वाटत आहे.
राज्यभरात २ हजार ४२६ पोस्टाच्या विविध जागेची भरती सुरु करण्यात आली आहे़ यामुळे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यासाठी पोस्टमन १६८०, मेल गार्ड २१, एमटीएस ७२५ या प्रमाणात जागेची भरती सुरु झाली आहे़ यासाठी शैक्षणित पात्रता पोस्टमन व एमटीएससाठी १० वी पास व मेलगार्डसाठी आयटीआय व १० वी पास ही पात्रता ठेवण्यात आली असून, यासाठी परीक्षा फिस महिलांसाठी १०० रुपये, इतर प्रवर्गासाठी १००, खुला प्रवर्गासाठी ५०० रुपये या प्रमाणात पोस्टामध्ये फिस भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत पात्रताधारक उमेदवारांनी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.डीओपीएमएएच.इन या संकेतस्थळावर आपला आॅनलाईन अर्ज भरता येईल. असे पोस्टमास्तर पी़व्ही़ कोलपाक व मार्केटिंग अधीकारी माळी यांनी सांगितले.
लातूर मुख्य पोस्ट कार्यालयाबरोबरच जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयामध्ये आतापर्यंत आहे त्याच कर्मचाऱ्याची प्रमोशन भरती होत होती़ तर थेट भरतीची प्रक्रिया दिल्ली, मुंबई, पुणे या ठिकाणीच होत होती़ परंतु रिक्त जागेंची संख्या वाढत चालल्याचे लक्षात आल्याने लातूर जिल्ह्यात ३९ जागांसाठी थेट भरती करण्यात येत आहे़ त्यामध्ये लातूर बरोबर राज्यभरातील इतर जिल्ह्याचा समावेश आहे़