१८४ शिक्षकांना पदवीधरची पदस्थापना
By Admin | Updated: July 16, 2014 00:50 IST2014-07-16T00:28:32+5:302014-07-16T00:50:02+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या १८४ प्राथमिक शिक्षकांना पदवीधरची पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

१८४ शिक्षकांना पदवीधरची पदस्थापना
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या १८४ प्राथमिक शिक्षकांना पदवीधरची पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
शिक्षणाचा अधिकार अंतर्गत पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक तर सहावी ते आठवी उच्च प्राथमिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या पदांसाठी प्राथमिक शिक्षकांमधूनच पदवीधरची पदस्थापना देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील १८७ शिक्षकांची प्राथमिक पदवीधर पदस्थापनेसाठी निवड करण्यात आली होती; परंतु यातील तीन शिक्षकांकडे हिंदी विद्यापीठाची पदवी असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले.
उर्वरित १८४ शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश बुधवारी किंवा गुरूवारी निघण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षक संघाची तक्रार
प्राथमिक पदवीधर पदस्थापना देण्यात येणाऱ्या शिक्षकांची माहिती पंचायत समित्यांकडून मागविण्यात आली. त्यामध्ये बीएड् प्रवेशपात्र शिक्षकांचीही माहिती मागविण्यात आली होती. त्यावेळी ज्या मुक्त विद्यापीठाच्या शिक्षकांनी २०१४ ची बीएड्ची परीक्षा दिली होती. त्यांचा निकाल १० जुलै रोजी घोषित करण्यात आला. त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यात आले नाही, हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळे त्यांनाही या संधी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश बोरुडे, एम.वाय.चाटसे, देहगावकर, नागरे, जाधव, पवार, शिंदे आदींनी केली आहे.