कारखान्यांसमोर ऊसटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 00:55 IST2016-11-18T00:57:17+5:302016-11-18T00:55:02+5:30

कळंब अलिकडे राज्याच्या साखर कारखानदारीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखानदारीपुढेही यावर्षीही ऊसटंचाईचे संकट घोंघावत आहे.

Post-crisis crisis | कारखान्यांसमोर ऊसटंचाईचे संकट

कारखान्यांसमोर ऊसटंचाईचे संकट

बालाजी आडसूळ कळंब
अलिकडे राज्याच्या साखर कारखानदारीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखानदारीपुढेही यावर्षीही ऊसटंचाईचे संकट घोंघावत आहे. यामुळे जिल्ह्यातील १४ प्रमुख साखर कारखान्यांपैकी केवळ दोनच कारखान्यांचे ‘बॉयलर’ सद्यस्थितीत अग्नीप्रदीपन झाले असून, इतर व्यवस्थापनाचा यंदा कल 'क्रशींग' बंद ठेवण्याकडेच दिसून येत आहे. उपलब्ध ऊसाचाही बेण्यासाठीच अधिक वापर होत असल्याने गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांनाही गेटकेन ऊसावर अवलंबून रहावे लागणार आहे. एकूणच या स्थितीचा जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा फटका बसणार आहे.
तीन दशकांपूर्वी तेरणासारख्या कारखान्याचा अपवाद वगळता साखर उद्योगाच्या गणतीमध्ये जिल्ह्याचा नामोल्लेख होत नव्हता. सिंचनाची मर्यादित साधने, प्रचलित पीक पद्धती, मोजकेच एक-दोन कारखाने यामुळे उसाचे क्षेत्र जेमतेमच असायचे. यातही तेरणापट्टा वगळता इतर भागात ऊसाची गोडी गुळापुरतीच मर्यादीत रहायची. परंतु, नव्वदच्या दशकात जिल्ह्यातील पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल झाले. अनेक नवी जलसाठवण स्त्रोत अस्तित्वात आली. वैयक्तिक विहिर व बोअरवेल्सची संख्या वाढत गेली. जशी साधनं वाढली तशी लगतच्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊसशेतीची बागायती हवा डोक्यात शिरकाव करू लागली. यातूनच जिल्हयात ऊस शेतीमध्ये झपाट्याने वाढ झाली. यामुळे तेरणा, तुळजाभवानी नंतर क्रमाक्रमाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊसशेतीला समांतर साखर कारखानदारी बहरू लागली. यामुळेच गत दहा वर्षात राज्यतील साखर कारखानदारीच्या आलेखात जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान नोंदले जावू लागले. या साखर कारखानदारीचा ग्रामीण भागातील लोकजीवनावर सुपरिणाम तर झालाच शिवाय अर्थकारणासही मोठा हातभार लागला आहे.
असे असताना जिल्ह्यात २०१० नंतर पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. अत्यल्प पावसाने नदी, नाले अपवादानेच वाहिले. या स्थितीचा पाणीसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होवून जिल्ह्यात बहरलेल्या ऊसशेतीला नकळत उतरती कळा लागत गेली. जवळपास साठ हजार हेक्टरच्या पुढे सरकलेल्या ऊस क्षेत्रात २०१३ पासून दरवर्षी घट होत चालली. यातच २०१४-१५ मध्ये यात लक्षणीय घट झाली. साल २०१५-१६ मध्ये तर गावोगावी पिण्याचे पाणी उपलब्ध होणे कठीण झाले होते. यामुळे प्रत्येक गावात केवळ बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांकडे तोही अल्प स्वरूपात ऊस शिल्लक राहिला आहे. बागायतदारांवरही तुळशीच्या लग्नाला ऊस शोधण्याची वेळ आली होती. एकीकडे कारखानदारी विकसित होत असताना जिल्ह्यात अत्यल्प पावसाने ऊसशेती संकटात सापडत चालली होती. २०११ ते २०१५ या पाच वर्षातील असमाधानकारक पर्जन्याचा परिणाम यंदा दिसून आला असून, सुस्थितीत असलेल्या सर्वच कारखान्यांपुढे ऊसटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. दुष्काळी स्थितीमुळे नॅचरलच्या कार्यक्षेत्रातही जवळपास दहा हजार हेक्टर ऊसाची तूट आहे. अशीच समस्या इतर कारखान्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कारखान्यांची संख्या मोठी असली तरी नॅचरल, शंभू महादेव, भैरवनाथ, लोकमंगल, कंचेश्वर, भीमाशंकर हे खाजगी, तर डॉ. आंबेडकर, विठ्ठलसाई, शिवशक्ती इ. दहा कारखाने गाळपाच्या शर्यतीत मोठ्या ताकदीने उतरू शकत होते. परंतु ऊसटंचाईचा प्रश्न असल्याने व गेटकेन ऊसाचीही शाश्वती नसल्याने यातील केवळ पाच कारखान्यांनीच साखर आयुक्त कार्यालयाकडे गाळप हंगाम २०१६-१७ साठी तयारी असल्याचे कळविल्याचे नांदेड येथील सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
यात शंभू महादेव (कळंब), विठ्ठलसाई (मुरूम), कंचेश्वर (तुळजापूर) व लोकमंगल (लोहारा) यानी स्वारस्य दाखवले असले तरी प्रत्यक्षात ‘बॉयलर’ पेटवून ‘क्रशींग’ची तयारी केवळ विठ्ठलसाई व शंभू महादेवनेच सुरू केली आहे. यंत्रणांची जुळवाजुळव, उसाचे नियोजन यात या दोन्ही कारखान्याचे व्यवस्थापन सध्या व्यस्त आहे.

Web Title: Post-crisis crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.