शहरातील नऊ मुख्य रस्त्यांवरील टीडीआरबंदी उठण्याची शक्यता

By Admin | Updated: July 30, 2016 01:02 IST2016-07-30T00:53:46+5:302016-07-30T01:02:48+5:30

औरंगाबाद : शहरातील प्रमुख नऊ रस्त्यांवर टीडीआर वापरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी गुरुवारी औरंगाबादेतील बांधकाम व्यावसायिक, लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

The possibility of raising TDR restrictions on nine main roads in the city | शहरातील नऊ मुख्य रस्त्यांवरील टीडीआरबंदी उठण्याची शक्यता

शहरातील नऊ मुख्य रस्त्यांवरील टीडीआरबंदी उठण्याची शक्यता

औरंगाबाद : शहरातील प्रमुख नऊ रस्त्यांवर टीडीआर वापरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी गुरुवारी औरंगाबादेतील बांधकाम व्यावसायिक, लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात महापालिकेला त्वरित अहवाल पाठविण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे. शासनाने टीडीआर वापरण्याची मुभा दिल्यास शहरातील मुख्य रस्त्यांवर मेट्रो सिटीसारख्या गगनचुंबी इमारती उभ्या राहतील.
महापालिकेने २००७-०८ या आर्थिक वर्षात शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास मालमत्ताधारकांना नकार दिला. महापालिकेच्या या निर्णयामुळे प्रमुख रस्त्यांवर मोठमोठ्या इमारती उभारण्याचा मार्ग बंद झाला आहे. २०१६ मध्ये शासनाने टीडीआरला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन नियमावली वापरणे सुरू केले आहे. औरंगाबाद महापालिका आजही जुन्या नियमांचा आधार देत नागरिकांना टीडीआरपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला. २००७ मधील नियम टी-१० त्यामधील पोटकलम ‘अ’ आणि ‘ए’ झोनमधील ‘एच’मधील तरतुदी वगळण्यात याव्यात. रस्त्यांच्या रुंदीनुसार नवीन धोरण शासनाने निश्चित केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आ. विनायक मेटे, आ. अतुल सावे, आ. सुभाष झांबड, क्रेडाईचे नितीन बगडिया, सलीम पटेल, संजय केणेकर आदींनी घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामीण विकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा पालवे यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांना दिल्या. यावेळी महापालिकेतील प्रभारी सहायक संचालक नगररचना ए. बी. देशमुख उपस्थित होते. करीर यांनी यासंदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठवावा, असे आदेश दिले.
अहवाल पाठविणार
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील नऊ मुख्य रस्त्यांवरील टीडीआर बंदी उठविण्याबाबत चर्चा झाली. शासनाने महापालिकेला याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही लवकरच मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शासनाला अहवाल देणार आहोत. त्यानंतर शासन अंतिम निर्णय घेईल.
-ए. बी. देशमुख, प्रभारी सहायक संचालक, नगररचना, मनपा
लवकरच आदेश निघेल
औरंगाबाद शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास बंदी आहे. या रस्त्यांवर मोठ्या इमारती उभारणे शक्य होत नव्हते. बांधकाम व्यावसायिक, लोकप्रतिनिधींनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी बंदी उठविण्यास तत्त्वत: मान्यता दिली. लवकरच शासनादेश निघेल.
-नितीन बगडिया,
बांधकाम व्यावसायिक

 

Web Title: The possibility of raising TDR restrictions on nine main roads in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.