दिवाळीवर पावसाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:32 IST2017-10-15T01:32:26+5:302017-10-15T01:32:26+5:30
दिवाळी काही दिवसांवर आलेली असतानाही शहरावर पावसाचे सावट कायम आहे

दिवाळीवर पावसाचे सावट
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिवाळी काही दिवसांवर आलेली असतानाही शहरावर पावसाचे सावट कायम आहे. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणात वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह अधूनमधून पाऊस पडतोय. शनिवारीदेखील (दि.१४) त्याला अपवाद ठरला नाही.
दुपारी ४ वाजता ढग दाटून आले आणि सुमारे अर्धा तास धो-धो पावसाने शहर अक्षरश: धुऊन काढले. या अर्ध्या तासात चिकलठाणा वेधशाळेमध्ये ९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सकाळी काही काळ उन्हाचा पारा वाढला
होता. त्यानंतर दुपारी ढगाळ वातावरण झाले. हर्सूल, पिसादेवी, मयूरपार्क आदी भागात दुपारी दोन वाजेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. हळूहळू मग संपूर्ण शहरात सरी
बरसल्या.
मध्य शहर, सिडको, निराला बाजार, गुलमंडी, मुकुंदवाडी, जयभवानीनगर, सातारा परिसर, विद्यापीठ या भागांत पावसाचा जोर अधिक होता.
सायंकाळी पाचनंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. काळे ढग एवढे दाट होते की, चार वाजताच सायंकाळ झाल्याचा भास होत होता.
शुक्रवारीदेखील शहरातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. औरंगाबादमध्ये परतीच्या पावसाचा मुक्काम सुरूच आहे. गेले सात दिवस विजांच्या कडकडाटासह शहरातील बहुतेक ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.
ग्राहक-विके्रत्यांची दैना
दुसरा शनिवारी असल्याने अनेक कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे दुपारपासूनच बाजारपेठांमध्ये शहरवासीयांची गर्दी झाली होती; परंतु दुपारनंतर ढग जमा होण्यास सुुरुवात झाली आणि थंड वारे वाहू लागले.
चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस पडू लागल्यावर रस्त्यावरील हातगाड्यांवरील विक्रे त्यांची दैना उडाली.
माल भिजण्यापासून वाचविताना त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. पावसामुळे नागरिकांच्याही दिवाळी खरेदीच्या उत्साहावर
पाणी
फिरले.