पराभवास वानखेडे स्वत:च जबाबदार

By Admin | Updated: June 1, 2014 00:27 IST2014-06-01T00:03:43+5:302014-06-01T00:27:38+5:30

हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाला स्वत: माजी खा. सुभाष वानखेडे हेच जबाबदार असून,

Possession Wankhede is responsible for himself | पराभवास वानखेडे स्वत:च जबाबदार

पराभवास वानखेडे स्वत:च जबाबदार

हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाला स्वत: माजी खा. सुभाष वानखेडे हेच जबाबदार असून, त्यांनी शिवसेना सोडून अन्य पक्षांसोबत घरोबा करणार्‍या व्यक्तींकडे प्रचार यंत्रणा दिल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक नाराज झाले. याचा परिपाक वानखेडे यांच्या पराभवात झाला, असे उत्तर शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍यांनी वानखेडे यांना दिले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजी खा. सुभाष वानखेडे समर्थकांकडून पराभवाचे खापर इतरांवर फोडण्याचा फंडा सुरू आहे. खरे तर गेल्या ३ वर्षांपासून वानखेडे यांच्या कार्यशैलीमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेचा उमेदवार बदलण्याची मागणी पक्ष प्रमुखांकडे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी केली होती. मात्र वानखेडे यांनाच उमेदवारी मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला; परंतु गेल्या पाच वर्षांपासून त्यांची शिवसैनिकांशी नाळ तुटली होती. काँग्रेस- राष्टÑवादीच्या आमदारांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी माजी आमदार व जिल्हा परिषदेवर टीका केली. जि.प. अध्यक्ष व सभापती निवडीत सदस्यांमध्ये फूट पाडून विरोधकांशी हातमिळवणी केली. या त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या बाबी आहेत. तसेच वानखेडे यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणा आजी-माजी पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता शिवसेना सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या नेत्यांच्या हातामध्ये दिली. त्याचा परिपाक वानखेडे यांच्या पराभवात झाला. त्यामुळे दुसर्‍यांवर गद्दारीचा आरोप करणार्‍यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे आत्मपरीक्षण करावे व निष्ठावान शिवसैनिकांवर आरोप करू नये, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रसिद्धीपत्रकावर माजी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत देशमुख, बालाजी तांबोळी, सखाराम उबाळे, बालाजी पाटील बोंढारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. तसेच उपजिल्हाप्रमुख सुनील काळे यांचे नाव आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Possession Wankhede is responsible for himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.